कानपूर - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हा २५ नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्याला सुरुवात होण्यासाठी आता अवघे काही तास उरले असताना येथील खेळपट्टीबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. मिळत असलेल्या माहितीनुसार भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी प्रॅक्टिस पिचबाबत तक्रार केली. या खेळपट्टीवर सराव करत असताना खेळाडू जखमी होण्याची भीती दोन्ही संघांना वाटत होती. त्यानंतर खेळपट्टीमध्ये बदल करण्यात आला. कानपूरमध्ये जवळपास पाच वर्षांनंतर कसोटी सामना होत आहे. मात्र तरीही पिचबाबत प्रश्न उपस्थित झाल्याने उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न निर्माण झाले आहे.
कर्णधार अजिंक्य रहाणे आणि प्रशिक्षक राहुल द्रविड सोमवारी कानपूरमधील खेळपट्टी पाहण्यासाठी गेले होते. मात्र हे दोघेही खेळपट्टीबाबत नाखूश दिसले. त्यानंतर त्यांनी न्यूट्रल पिच क्युरेटर एल. प्रशांत राव यांच्याशी चर्चा केली. तसेच खेळपट्टीमध्ये सुधारणा करण्यास सांगितले. त्यानंतर न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनीही खेळपट्टीच्या बाऊन्सबाबत तक्रार केली. त्यानंतर येथील क्युरेटर शिवकुमार आणि बीसीसीआयचे न्यूट्रल क्युरेटर एल. प्रशांत राव त्यामध्ये सुधारणा करताना दिसले. त्यानंतर मंगळवारी सकाळी न्यूझीलंडच्या संघाने येथे सराव केला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेली तीन टी-२० सामन्यांची मालिका भारतीय संघाने ३-० अशा फरकाने जिंकली होती. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघ विराट कोहली, रोहित शर्मा या प्रमुख फलंदाजांविना खेळणार आहे. त्यातच लोकेश राहुल हाही दुखापतग्रस्त झाल्याने तो पहिल्या कसोटीला मुकणार आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघासमोर न्यूझीलंडचे खडतर आव्हान असेल. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना ३ डिसेंबरपासून मुंबईत खेळवला जाणार आहे.
न्यूझीलंडच्या संघाची भारतातील कामगिरी सुमार आहे. दोन्ही संघांमध्ये भारतात आतापर्यंत ११ कसोटी मालिका खेळल्या गेल्या आहेत. त्यातील एकही मालिका न्यूझीलंडला जिंकता आलेली नाही. तर भारतीय संघाने नऊ मालिका जिंकल्या आहेत. त्यामुळे भारतात खेळताना न्यूझीलंडचाही कस लागणार आहे.