IND vs NZ, 1st Test : भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी राहुल द्रविड ( Rahul Dravid) याच्याकडे आल्यानंतर आपलाच माणूस त्या पदावर असल्याचे ९०च्या दशकातील अनेक क्रिकेटचाहत्यांना वाटत आहे. त्याला कारणही तसेच आहे. एक आदर्श क्रिकेटपटू कसा असावा याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे राहुल द्रविड... टीम इंडिया जेव्हा जेव्हा अडचणीत सापडली तेव्हा द्रविड ढाल बनून नेहमी उभा राहिला. सलामीवीर, यष्टिरक्षक अगदी गोलंदाजाच्या भूमिकेतही द्रविड दिसला. कधीही प्रसिद्धीची हाव नाही आणि मी संघासाठी भरपूर काही केलंय, असाही आवीर्भाव कधीच नाही. सेवा करायची तर ती संपूर्ण मनापासून, मग त्यातून मोबदला मिळो किंवा न मिळो... याची पर्वा त्यानं कधीच केली नाही. म्हणूनच त्यानं क्रिकेट चाहत्यांच्या मनात एक आदर्श स्थान निर्माण केलं आहे. आताही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या एका विनंतीवर द्रविड मुख्य प्रशिक्षक बनण्यास तयार झाला. त्याचा साधेपणा आजही तसाच आहे.
कानपूर कसोटीत भारताला विजयापासून वंचित रहावे लागले. पदार्पणवीर श्रेयस अय्यरनं ( Shreyas Iyer) मिळालेल्या संधीचं सोनं करताना पहिल्या डावात शतक व दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावून दमदार कामगिरी केली. अक्षर पटेल ( Axar Patel) यानं पहिल्या डावात किवींना दणका दिला, वृद्धीमान सहा ( Wridhiman Saha) वेदनेसह खेळला अन् अर्धशतक झळकावून संघाच्या खात्यात महत्त्वपूर्ण धावा जोडल्या. आर अश्विन ( R Ashwin) यानं अष्टपैलू कामगिरी केली. रवींद्र जडेजानं ( Ravindra Jadeja) दुसऱ्या डावात सामन्याला कलाटणी दिली. पण, भारताला विजय मिळवता आला नाही. भारताच्या पहिल्या डावातील ३४५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडनं २९६ धावा केल्या. भारतानं दुसरा डाव ७ बाद २३४ धावांवर घोषित करून किवींसमोर विजयासाठी २८४ धावांचे लक्ष्य ठेवले आणि त्यांनी दुसऱ्या डावात ९ बाद १६५ धावा करून सामना अनिर्णित राखला.
या सामन्यानंतर टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविड यानं कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवरील ग्राऊंड्समनला स्वतःच्या खिशातून ३५ हजार रुपये दिले. कसोटी क्रिकेटसाठी उत्तम खेळपट्टी तयार केल्याचं कौतुक म्हणून द्रविडनं ही रक्कम दिली आणि त्यानं यावेळी त्यांना अशीच कामगिरी करण्याचा सल्लाही दिला.
Web Title: IND vs NZ, 1st Test : Rahul Dravid donated Rs 35,000 from his own pocket to the Green Park groundsmen, kanpur for preparing the very good pitch
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.