IND vs NZ 1st Test Tom Latham Lead New Zealand Ending 36 year Wait For Test Win In India : घरच्या मैदानात पाहुण्या संघाला पराभवाचं पाणी पाजून पाहुणचार करणाऱ्या टीम इंडियावर बंगळुरुच्या मैदानात मोठी नामुष्की ओढावली. टॉम लॅथमच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाने नवा इतिहास रचत टीम इंडियालाच पराभवाच पाणी पाजलं. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या मालिका विजयाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या किवींनी बंगळुरुचं मैदान मारत ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
न्यूझीलंडच्या संघानं याआधी १९८८ मध्ये जिंकला होता सामना
१९८८ नंतर न्यूझीलंडच्या संघानं ३६ वर्षांनी पहिल्यांदा भारतीय मैदानात कसोटी सामना जिंकला आहे. बंगळुरु कसोटी सामन्यातील पहिला दिवस पावसाने वाया गेल्यावर दुसऱ्या दिवशी नाणेफेक जिंकत रोहित शर्मानं पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय चांगलाच फसला. भारतीय संघ पहिल्या डावात फक्त ४६ धावांत ऑल आउट झाला. हाच आकडा टीम इंडियाच्या पराभवास कारणीभूत ठरला.
दोन विकेट्स मिळाल्या, पण
पाचव्या आणि अखेरच्या दिवशी न्यूझीलंडच्या संघासमोर विजयासाठी १०७ धावांचे आव्हान होते. या परिस्थितीत टीम इंडियाला एक तर पाऊस वाचवू शकत होता, किंवा विकेट्सची 'बरसात' झाली तर टीम इंडिया कमबॅक करू शकणार होती. जसप्रीत बुमराहनं पाचव्या दिवसाच्या खेळाच्या दुसऱ्याच चेंडूवर न्यूझीलंडचा कॅप्टन टॉम लॅथम याला शून्यावर माघारी धाडून आशा पल्लवित केल्या. डेवॉन कॉन्वेच्या रुपात बुमराहनेच भारतीय संघाला १७ (३९) दुसरी विकेट विकेट मिळवून दिली. पण त्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी गडबड घोटाळा न करता निर्माण झालेल्या संधीच सोनं करून दाखवलं. न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील हिरो रचिन रविंद्र ३९ (४६) आणि विल यंग ४८(७६) यांनी लंचआधीच संघाला विजय मिळवून दिला. न्यूझीलंडच्या संघाने ८ विकेट्स राखून सामना जिंकून दाखवला. भारतीय मैदानात त्यांचा हा तिसरा विजय आहे.
२०१३ पासून भारतीय संघानं घरच्या मैदानात गमावलेले ५ कसोटी सामने
भारतीय संघाला घरच्या मैदानावर पराभूत करुन दाखवणं कोणत्याही परदेशी संघासाठी एक मोठं आव्हान असते. २०१३ पासून आतापर्यंत फक्त इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियानं भारतीय संघाला कसोटी सामन्यात पराभूत करून दाखवले होते. यात आता न्यूझीलंडच्या संघाचा समावेश झाला आहे.
- २०२४ - न्यूझीलंडच्या संघानं ८ विकेट्स राखून मारल बंगळुरुचं मैदान
- २०२४- इंग्लंडच्या संघाने हैदराबादच्या मैदानात २८ धावांनी जिंकला होता कसोटी सामना
- २०२३- इंदुरच्या मैदानात ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाला ९ विकेट्सनं दिली होती मात
- २०२१- चेन्नई कसोटी सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाला २२७ धावांनी केलं होते पराभूत
- २०१७- ऑस्ट्रेलियाने पुण्याच्या मैदानातील कसोटी सामन्यात ३३३ धावांनी दिला होता शह
Web Title: IND vs NZ 1st Test Rohit Sharma Team India Lost Bengaluru Test Tom Latham Lead New Zealand Ending 36 year Wait For Test Win In India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.