- अयाज मेमन(कन्सल्टिंग एडिटर) आंतरराष्ट्रीय स्तरावर तितका अनुभव नसलेले श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीवर नियंत्रण मिळवून दिले आहे. अद्याप दोन दिवस शिल्लक असल्याने सामना तुल्यबळ असू शकेल. या दोन खेळाडूंनी प्रयत्न केले नसते तर मात्र भारताची अवस्था वाईट झाली असती. पदार्पणात अय्यरने शतकी खेळी करीत श्रेयसने चपळपणे स्वत:च्या शैलीदार फटकेबाजीने वर्चस्व राखले. त्याचा स्ट्राईक रेट पाहता ही खेळी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. फलंदाज या नात्याने तो मॅचविनर ठरू शकतो.
जडेजा जखमेतून सावरत असल्याने अक्षरने इंग्लंडविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. त्याने चौथ्यांदा पाच गडी बाद केले. स्थानिक खेळपट्ट्यांवर ही कामगिरी असती तरी ती अप्रतिम आहे. चेंडूवर नियंत्रण राहून फलंदाजांना गोंधळात टाकण्याचे अक्षरमध्ये कसब आहे. अय्यर आणि अक्षर पाच-सहा वर्षांपासून स्थानिक सामन्यात दमदार कामगिरी करीत आहेत. तरी राष्ट्रीय निवड समितीचे त्यांच्याकडे आधी लक्ष नव्हते. आता यशाच्या बळावर दोघांनी अंतिम एकादशमध्ये स्थान पटकाविले आहे.
गेल्या काही वर्षांत काहींचा फॉर्म हरवला. अय्यरसारखे चांगले फलंदाज पुढे येत असल्याने, पुजारा आणि रहाणे यांचे स्थान खिळखिळे होण्याच्या स्थितीत आहे. राहुल आणि विराट परतल्यानंतर काहींना बाहेरचा रस्ता दाखविला जाऊ शकेल. कोहली मुंबईत दुसऱ्या कसोटीसाठी परतल्यावर चौथ्या क्रमांकावर तो फलंदाजी करेल. पदार्पणात अय्यरचे शानदार शतक पाहता, तो स्वत:चे स्थान कायम राखेल असे दिसते. याचा अर्थ पुजारा किंवा रहाणे यांच्यापैकी एकाची गच्छंती ठरलेली असावी. मुद्दा पुजारा आणि रहाणेपुरता मर्यादित नाही. रोहित आणि राहुल दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी परतल्यानंतर अग्रवाल आणि गिल यांना स्वत:चा मार्ग शोधावा लागणार आहे. अंतिम एकादशमध्ये स्थान मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा असेल. सध्या सर्वांच्या नजरा पुजारा आणि रहाणेवर आहेत. दुसऱ्या डावात त्यांची कामगिरी कशी होते, यावर त्यांची पुढील कारकीर्द ठरणार आहे.
चार किंवा पाच जागांसाठी नऊ ते दहा खेळाडू चढाओढीत असतील, तर हे अपेक्षित देखील असते. अनेकदा निवडकर्ते अडचणीत येतात, हताश होतात. उदा. हनुमा विहारीला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी संघातून वगळण्यात आले, नंतर पर्याय म्हणून दक्षिण आफ्रिकेला पाठविले. दुसरीेकडे मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि स्टँड-इन कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी सुरुवातीच्या काळात यशस्वी होऊन संघात जवळपास स्थान निश्चित केले आहे.