Join us  

IND vs NZ 1st Test : श्रेयसचे ऐतिहासिक शतक; नाबाद शतकी सलामीच्या जोरावर न्यूझीलंडचे जोरदार प्रत्युत्तर

अय्यरने शानदार फलंदाजी करताना कसोटी पदार्पणात शतक झळकावण्याचा पराक्रम केला. मात्र, यानंतरही दुसऱ्या दिवसावर पूर्णपणे वर्चस्व राहिले ते न्यूझीलंडचे. पहिल्या दिवशी काएल जेमिन्सने भेदक मारा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी साऊदीने भारतीयांची दाणादाण उडवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 8:23 AM

Open in App

कानपूर : मुंबईकर श्रेयस अय्यरने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ऐतिहासिक शतक झळकावताना भारताला चांगल्या स्थितीत आणले. कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा तो १६वा भारतीय ठरला. यानंतर वेगवान गोलंदाज टिम साऊदीचा भेदक मारा आणि टॉम लॅथम-विल यंग या सलामीवीरांच्या नाबाद शतकी भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने जबरदस्त पुनरागमन करत भारताला जोरदार प्रत्युत्तर दिले. भारताचा डाव १११.१ षटकांत ३४५ धावांत गुंडाळल्यानंतर किवींनी दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद १२९ अशी भक्कम वाटचाल केली.

अय्यरने शानदार फलंदाजी करताना कसोटी पदार्पणात शतक झळकावण्याचा पराक्रम केला. मात्र, यानंतरही दुसऱ्या दिवसावर पूर्णपणे वर्चस्व राहिले ते न्यूझीलंडचे. पहिल्या दिवशी काएल जेमिन्सने भेदक मारा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी साऊदीने भारतीयांची दाणादाण उडवली. त्याने भारताविरुद्ध तिसऱ्यांदा अर्धा संघ बाद करताना ६९ धावांत ५ बळी घेतले. साऊदीने जडेजाला त्रिफळाचीत केल्यानंतर भारतीयांना ठरावीक अंतराने धक्के बसले. जडेजाला दुसऱ्या दिवशी एकही धाव काढता आली नाही. तो ५० धावांवरच परतला. यानंतर केवळ रविचंद्रन अश्विनने ५६ चेंडूंत ५ चौकारांसह ३८ धावा काढत झुंज दिली.

अय्यरने १७१ चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह १०५ धावा केल्या. शतक झळकावल्यानंतर काही वेळानेच तो साऊदीचा शिकार ठरला. फिरकीपटू एजाझ पटेलने ९० धावांत २ बळी घेत चांगला मारा केला. त्याचे वळणारे चेंडू पाहून भारतीय फिरकीपटू वर्चस्व राखणार असेच चित्र होते. मात्र, तसे काहीच झाले नाही.

भारताच्या धावांचा पाठलाग करताना लॅथम-यंग यांनी सावध परंतु भक्कम सुरुवात केली. दोघांनी अत्यंत संयमी खेळी करताना धोकादायक फटके खेळणे टाळले. इशांत शर्मा आणि उमेश यादव या वेगवान गोलंदाजांना खेळल्यानंतर रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या फिरकी त्रयीचा नेटाने सामना केला. गोलंदाजाला मिळत नसलेले यश पाहून भारतीयांच्या चेहऱ्यावरील दडपण आणि निराशा स्पष्ट दिसून आली. दिवसअखेर लॅथमने १६५ चेंडूंत ४ चौकारांसह नाबाद ५० धावा केल्या, तर यंगने १८० चेंडूंत नाबाद ७५ धावा फटकावताना १२ चौकार खेचले आहेत.

योगायोग!- पहिल्या दिवसअखेर श्रेयस अय्यर -रवींद्र जडेजा अनुक्रमे ७५ आणि ५० धावांवर नाबाद राहिले होते.  दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडचे विल यंग ७५, तर लॅथम ५० धावांवर नाबाद राहिले.  - कसोटी पदार्पणातील पहिल्या डावात शतक ठोकणारा अय्यर १३वा भारतीय.- कानपूर येथे कसोटी पदार्पणात शतक ठोकणारा अय्यर केवळ दुसरा फलंदाज.- कसोटी पदार्पणात मायदेशात शतक झळकावणारा दहावा भारतीय.- टॉम लॅथम आणि विल यंग भारतात २०१६ नंतर शतकी सलामी देणारी पहिली विदेशी जोडी ठरली. २०१६ मध्ये इंग्लंडच्या कूक-जेनिंग्ज यांनी १०३ धावांची सलामी दिली होती.

कसोटी पदार्पणात शतक झळकावणारे भारतीय... -खेळाडू          विरुद्ध             वर्षलाला अमरनाथ - इंग्लंड - १९३३दीपक शोधन - पाकिस्तान - १९५२अर्जन कृपालसिंग - न्यूझीलंड - १९५५अब्बास अली बेग - इंग्लंड - १९५९हनुमंतसिंग - इंग्लंड - १९६४गुंडप्पा विश्वनाथ - ऑस्ट्रेलिया - १९६९सुरिंदर अमरनाथ - न्यूझीलंड - १९७६मोहम्मद अझहरूद्दीन - इंग्लंड - १९८४प्रवीण आमरे - दक्षिण आफ्रिका - १९९२सौरव गांगुली - इंग्लंड - १९९६वीरेंद्र सहवाग - दक्षिण आफ्रिका - २००१सुरेश रैना - श्रीलंका - २०१०शिखर धवन - ऑस्ट्रेलिया - २०१३रोहित शर्मा - वेस्ट इंडीज - २०१३पृथ्वी शॉ - वेस्ट इंडीज - २०१८श्रेयस अय्यर - न्यूझीलंड - २०२१

धावफलक -भारत पहिला डाव : मयंक अग्रवाल झे. ब्लाँडेल गो. जेमीसन १३, शुभमन गिल त्रि. गो. जेमीसन ५२, चेतेश्वर पुजारा झे. ब्लाँडेल गो. साउदी २६, अजिंक्य रहाणे त्रि. गो. जेमीसन ३५, श्रेयस अय्यर झे, यंग गो. साउदी १०५, रवींद्र जडेजा त्रि. गो. साउदी  ५०, रिद्धिमान साहा झे, ब्लाँडेल गो. साउदी १२, रविचंद्रन आश्विन त्रि. गो. पटेल ३८, अक्षर पटेल झे. ब्लाँडेल गो. साउदी ३, उमेश यादव नाबाद १०, इशांत शर्मा पायचीत गो. पटेल ००. अवांतर : १२. एकूण : १११.१ षटकांत सर्वबाद ३४५ धावा. बाद क्रम : १-२१, २-८२, ३-१०६, ४-१४५,५-२६६,६-२८८,७-३०५,८-३१३,९-३३९,१०-३४५. गोलंदाजी : टीम साउदी २७.४-६-६९-५, जेमीसन २३.२-६-९१-३, अयाज पटेल २९.१-७-९०-२, सोमरविले २४-२-६०-०, रचिन रवींद्र ७-१-२८-० न्यूझीलंड पहिला डाव : टॉम लाथम नाबाद ५०, विल यंग नाबाद ७५, अवांतर : ४, एकूण : ५७ षटकांत बिनबाद १२९ धावा. गोलंदाजी : ईशांत ६-३-१०-०, उमेश यादव १०-३-२६-०, आश्विन १७-५-३८-०, जडेजा १४-४-२८-०, अक्षर पटेल १०-१-२६-०. 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडश्रेयस अय्यर
Open in App