Ind vs NZ, Kanpur Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिकेतील पहिली कसोटी उद्या कानपूर येथे खेळवली जाणार आहे. भारतानं न्यूझीलंड विरुद्धच्या ट्वे्न्टी-२० मालिकेत एकही सामना किवींना जिंकू दिला नाहा. आता कसोटी मालिकेतही निर्विवाद वर्चस्व राखण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे. भारतीय कसोटी कसोटी संघात विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्यासारखे मातब्बर खेळाडू अनुपस्थित असले तरी भारतीय संघ पूर्ण तयारीनं मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.
विराट कोहलीला पहिल्या कसोटी आराम देण्यात आला आहे. तो मुंबईतील कसोटीत भारतीय संघात परतणार आहे. तर रोहित शर्माला दोन्ही कसोटी सामन्यांसाठी आराम देण्यात आला आहे. केएल राहुल पहिली कसोटी खेळणार होता. पण दुखापतीमुळे त्यालाही बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे आता भारतीय संघाचे अंतिम ११ खेळाडू कोण असतील याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. अजिंक्य रहाणे पहिल्या कसोटीत भारतीय संघाचं नेतृत्त्व करताना पाहायला मिळेल. पण रहाणे स्वत: फॉर्मात नाही. तर चेतेश्वर पुजारा देखील बऱ्याच काळापासून शतकी खेळी साकारू शकलेला नाही. श्रेयस अय्यर कानपूर कसोटीत भारतीय कसोटी संघात पदार्पण करणार आहे.
भारतीय संघाची गोलंदाजी मजबूत असल्याचं दिसून येत आहे. कानपूरची खेळपट्टी फिरकीपटूंना पोषक समजली जाते. यात भारतीय संघ तीन फिरकीपटूंसह उतरताना दिसू शकतो. यात रवींद्र जडेजा, आर.अश्विन यांच्यासोबत अक्षर पटेल देखील प्लेइंग इलेव्हनचा भाग होऊ शकतो. वेगवान गोलंदाजीत इशांत शर्माचं नाव पक्कं समजलं जात आहे. तर मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांच्यापैकी एका गोलंदाजाला संधी मिळू शकते.
असा असू शकतो भारतीय संघ-शुबमन गिल, मयांक अग्रवाल, श्रेयस अय्यर, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, वृद्धीमान साहा, रवींद्र जडेजा, आर.अश्विन, अक्षर पटेल, इशांत शर्मा आणि उमेश यादव