IND Vs NZ, 1st Test: भारताच्या मदतीला पुन्हा धावला अय्यर, न्यूझीलंडला विजयासाठी हव्या २८० धावा

IND Vs NZ, 1st Test: श्रेयस अय्यर आणि वृद्धीमान साहा यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने कठीण परिस्थितीतून बाहेर येत पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात रविवारी येथे सात बाद २३४ धावांवर डाव घोषित केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 06:31 AM2021-11-29T06:31:50+5:302021-11-29T06:32:25+5:30

whatsapp join usJoin us
IND Vs NZ, 1st Test: Shreyas Iyer runs again to help India, New Zealand need 280 runs for victory | IND Vs NZ, 1st Test: भारताच्या मदतीला पुन्हा धावला अय्यर, न्यूझीलंडला विजयासाठी हव्या २८० धावा

IND Vs NZ, 1st Test: भारताच्या मदतीला पुन्हा धावला अय्यर, न्यूझीलंडला विजयासाठी हव्या २८० धावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कानपूर : श्रेयस अय्यर आणि वृद्धीमान साहा यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने कठीण परिस्थितीतून बाहेर येत पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात रविवारी येथे सात बाद २३४ धावांवर डाव घोषित केला. त्यामुळे न्यूझीलंडला २८४ धावांचे लक्ष्य मिळाले. न्यूझीलंडची सुरुवात मात्र अडखळती झाली. सलामीवीर वील यंग याला अश्विनने पायचीत केले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडच्या संघाने चार धावा केल्या होत्या. पाचव्या दिवशी त्यांना विजयासाठी २८० धावा करायच्या आहेत.

चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सलामीवीर टॉम लॅथम दोन, तर  साॅमरविलेने खातेच उघडले नाही.   अय्यरने दुसऱ्या डावात देखील अर्धशतक झळकावले. अत्यंत दबावाच्या स्थितीत अय्यर याने १२५ चेंडूंत ६५ धावा केल्या. त्याने आठ चौकार आणि एक षट्कार लगावला. दुसऱ्या डावात दबावात त्याने अर्धशतक केले. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू बनला. त्याने अश्विन (३२) सोबत सहाव्या गड्यासाठी ५२ धावा केल्या, तर सातव्या गड्यासाठी साहासोबत ६४ धावांची भागीदारी केली. साहा याने देखील नाबाद ६१ धावा केल्या. त्याने १२६ चेंडूंत चार चौकार आणि एक षट्कार लगावला. साहाने अक्षर पटेल (नाबाद २८) सोबत आठव्या गड्यासाठी ६७ धावांची भागीदारी केली.   जेमिसन आणि टीम साऊथी यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय भूमीवर कोणत्याही परदेशी संघाला एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना विजय मिळवता आलेला नाही.  हा विक्रम वेस्ट इंडिजच्या नावावर आहे. १९८७ मध्ये नवी दिल्लीमध्ये २७६ धावांचे लक्ष्य गाठले होते.  

अशी कामगिरी करणारा अय्यर पहिला फलंदाज
पदार्पणातील कसोटीत पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक करणारा अय्यर हा पहिला भारतीय फलंदाज ठरला. या आधी दिलावर हुसेन यांनी १९३३-३४ मध्ये इंग्लंडविरोधात पहिल्या डावात ५९ आणि दुसऱ्या डावात ५७, तर सुनील गावसकर यांनी १९७०-७१ मध्ये वेस्ट इंडिजविरोधात पहिल्या डावात ६५ आणि दुसऱ्या डावात ६७ धावा केल्या होत्या.  अय्यर याने पहिल्या डावात १०५ आणि दुसऱ्या डावात ६५ धावा केल्या. 

खेळपट्टीकडून मदत नाही - अय्यर
भारतीय संघाने दुसऱ्या डावाची घोषणा करण्यास थोडा उशीर केला. मात्र  संघाच्या या निर्णयाचे अय्यर याने समर्थन केले. अपुऱ्या प्रकाशामुळे चौथ्या दिवशी लवकर डाव संपला. न्यूझीलंडच्या डावात फक्त चारच षटके टाकली गेली. त्यात अश्विनने यंगला बाद केले. अय्यर याने दिवसाचा खेळ संपल्यावर म्हटले की, या खेळपट्टीवर चेंडू वळत नाही. आम्हाला एका आव्हानात्मक धावसंख्येची गरज होती. मला वाटते की, हा नक्कीच चांगला स्कोअर आहे. आमच्याकडे सर्वोत्तम फिरकीपटू आहेत. त्यामुळे आशा आहे की, सोमवारी आमचे काम पूर्ण होईल. आम्हाला आमच्या फिरकीपटूंवर पूर्ण विश्वास आहे आणि ते न्यूझीलंडला अखेरच्या दिवशी दबावात राखतील. 

विल यंग बाद की नाबाद ?
न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात खराब होती. तिसऱ्या षटकांत यंग बाद झाला. त्याला रविचंद्रन अश्विन याने पायचीत केले. यंग याने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, तोपर्यंत त्याची  १५ सेकंदाची वेळ निघून गेली होती. त्यामुळे त्याला तंबूत परत जावे लागले. रिप्लेत तो बाद नव्हता हे स्पष्ट झाले. मात्र, त्याने वेळेत डीआरएस घेतला नाही. 

धावफलक
दुसरा डाव
भारत : ८१ षटकांत ७ बाद २३४ धावा मयांक अग्रवाल झे. लॅथम गो. साउथी १७, शुभमन गिल गो. जेमीसन १, चेतेश्वर पुजारा झे. टॉम ब्लन्डेल गो. जेमीसन २२, अजिंक्य रहाणे पायचीत गो. एजाज पटेल ४, श्रेयस अय्यर झे. टॉम ब्लंडेल गो. साऊथी ६५, रवींद्र जडेजा पायचीत गो. साऊथी ०, अश्विन गो. जेमीसन ३५, वृद्धीमान साहा नाबाद ६१, अक्षर पटेल नाबाद २८, अवांतर ४.
गडी बाद क्रम
१-२, २-३२,३-४१, ४-५१, ५-५१, ६-१०३, ७-१६७
गोलंदाजी : टीम साऊथी २२-२-७५-३, कायली जेमिसन १७-६-४०-३, एजाज पटेल १७-३-६०-१, रचिन रवींद्र ९-३-१७-०, सॉमरविले १६-२-३८-०.
न्युझीलंड : ४ षटकांत १ बाद ४ धावा
टॉम ब्लंडेल खेळत आहे २, विल यंग पायचीत गो. अश्विन २, विल्यम्स सॉमरविले खेळत आहे ०, 
गडी बाद क्रम १-३, 
गोलंदाजी आर. अश्विन २-०-३-१, अक्षर पटेल २-१-१-०,

Web Title: IND Vs NZ, 1st Test: Shreyas Iyer runs again to help India, New Zealand need 280 runs for victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.