IND vs NZ 2024 1st Test India 1st Innings Fall of Wickets Video: न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाची सुरुवात अतिशय वाईट झाली. पहिल्या दिवसाचा खेळ पावसाने वाया घालवल्यानंतर दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या फलंदाजांनी अत्यंत खराब कामगिरी केली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांपुढे भारतीय फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातले. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन यांसारखे अनुभवी फलंदाज संघात असूनही भारताचा डाव अवघ्या ४६ धावांवर संपुष्टात आला. भारतीय संघाने केवळ ३१ षटकांत आपले १० बळी गमावले. विशेष म्हणजे, भारताचे निम्मे खेळाडू भोपळाही फोडू शकले नाहीत. पाहा कशा गेल्या भारतीय संघाच्या १० विकेट्स-
असा संपला टीम इंडियाचा डाव, पाहा Video:- ( १ ते ६ विकेट्स)
(७ - १० विकेट्स)
भारतीय संघाचे पाच फलंदाज शून्यावर
भारतीय डावाची सुरुवात संथ झाली. रोहित शर्मा अवघ्या २ धावांवर क्लीन बोल्ड झाला. रोहित पाठोपाठ विराट कोहली आणि सर्फराज खान दोघेही शून्यावरच माघारी परतले. त्यानंतर रिषभ पंत आणि यशस्वी जैस्वाल यांच्यात भागीदारी होण्यास सुरुवात झाली होती. पण जैस्वाल १३ धावा काढून तंबूत परतला. त्याच्याच पाठोपाठ केएल राहुल, रवींद्र जाडेजा आणि आर अश्विन हे तिघेही शून्यावर बाद झाले. रिषभ पंतने सर्वाधिक २० धावा केल्या. त्यानंतर मात्र भारताचा डाव ४६ धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंड कडून मॅट हेन्रीने १५ धावांत ५, विल ओ'रूरकेने २२ धावांत ४ तर टीम सौदीने १ बळी घेतला.