India vs New Zealand, 2nd ODI Live : भारतीय संघाने २०२३ मधील दुसरी वन डे मालिका जिंकली. वन डे वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने भारतीय संघासाठी सातत्यपूर्ण कामगिरी महत्त्वाची आहे. गोलंदाजांच्या कामगिरीमुळे भारताला आजचा सामना सहज जिंकता आला. या मालिका विजयासह भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. रोहित शर्माने अर्धशतकी खेळी करून विजयात हातभार लावला अन् भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. जागतिक क्रमवारीत नंबर १ असलेल्या न्यूझीलंडला भारताने पराभूत केले. घरच्या मैदानावरील मागील २४ मालिकांमधील भारताचा हा २२ वा मालिका विजय आहे.
मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात धक्का दिल्यानंतर मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर व हार्दिक पांड्या यांनी धक्के दिले. न्यूझीलंडचा निम्मा संघ १५ धावांवर माघारी पाठवला. ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल व मिचेल सँटरन यांनी संघर्ष करताना न्यूझीलंडला शतकी पल्ला पार करून दिला. पण, भारतीय गोलंदाज आज कमालीच्या फॉर्मात दिसले अन् त्यांनी किवींचा डाव १०८ धावांत गुंडाळला. शमीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ १०८ धावांत माघारी पाठवला. हार्दिक व वॉशिंग्टन यांनी प्रत्येकी २, तर शार्दूल व कुलदीप यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
न्यूझीलंडने समोर ठेवलेल्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व शुभमन गिल या जोडीला फार कष्ट घ्यावे लागले नाही. रोहित शर्माने ५० चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५१ धावा करताना भारताच्या विजयाचा पाया मजबूत केला. विराट कोहली पुन्हा एकदा मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर फसला अन् यष्टिचीत होऊन ११ धावांवर माघारी परतला. जागतिक क्रमवारीत नंबर १ असलेल्या न्यूझीलंडला भारताने पराभूत केले. घरच्या मैदानावरील मागील २४ मालिकांमधील भारताचा हा २२ वा मालिका विजय आहे.
१९८८ पासून न्यूझीलंडला भारतीय खेळपट्टीवर वन डे मालिका जिंकता आलेली नाही. १९८८ मध्ये भारताने ४-०, १९९५ मध्ये ३-२, १९९९ मध्ये ३-२, १०१० मध्ये ५-०, २०१६ मध्ये ३-२, २०१७ मध्ये २-१ अशी मालिका जिंकली आहे. २०२३ मध्ये भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. घरच्या मैदानावर भारताने सलग सातवी वन डे मालिका जिंकली आहे आणि हा मोठा विक्रम आहे. यापूर्वी त्यांना सलग ६ वन डे मालिका जिंकता आल्या होत्या. भारताने डिसेंबर २०१९ पासून घरच्या मैदानावर वेस्ट इंडिज ( २-१), ऑस्ट्रेलिया ( २-१), इंग्लंड ( २-१), वेस्ट इंडिज ( ३-०), दक्षिण आफ्रिका ( २-१), श्रीलंका ( ३-०) आणि न्यूझीलंड ( २-०*) असा विजय मिळवले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"