IND vs NZ 2nd ODI: भारत (Team India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (२७ नोव्हेंबर) हॅमिल्टन येथे खेळवला जाईल. पहिला सामना गमावल्यानंतर टीम इंडिया सध्या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे, अशा परिस्थितीत टीम इंडियाला मालिका जिंकण्यासाठी पुढील दोनही सामने जिंकावेच लागणार आहेत. पण दुसऱ्या वन डेपूर्वी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. या एका बाबीमुळे न्यूझीलंडमध्ये मालिका जिंकण्याचे टीम इंडियाचे स्वप्न भंगण्याची दाट शक्यता आहे.
दुसऱ्या सामन्यापूर्वी आलं संकट
टीम इंडियाने न्यूझीलंड दौऱ्यावर आतापर्यंत एकूण ४ सामने खेळले आहेत. या ४ सामन्यांपैकी २ सामने पावसामुळे वाया गेले. पहिल्या टी२० सामन्यात एकाही चेंडूचा खेळ झाला नाही. तर तिसऱ्या टी२० सामन्यातही पावसाने अडथळे आणले. आता रविवारी (२७ नोव्हेंबर) होणाऱ्या सामन्यावरही पावसाचा धोका निर्माण झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रविवारी हॅमिल्टन येथे होणाऱ्या सामन्याच्या वेळी पावसाची १०० टक्के शक्यता आहे. दोन संघांमधील हा सामना न्यूझीलंडच्या वेळेनुसार दुपारी २ वाजता आणि भारतीय वेळेनुसार सकाळी ७ वाजता खेळवला जाईल. या सामन्यात पावसाने अडथळा आणल्यास भारताच्या मालिका विजयाच्या स्वप्नाचा चुराडा होईल.
टीम इंडियाला दुसरा सामना जिंकणे आवश्यक
टीम इंडियाला वन डे मालिका जिंकायची असेल तर दुसरा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. पावसामुळे हा सामना रद्द झाला, तर शेवटच्या सामन्यात टीम इंडिया फक्त मालिका बरोबरीत आणण्यासाठी खेळेल. अशा परिस्थितीत टीम इंडियासाठी दुसरा सामना खूप महत्त्वाचा ठरणार आहे. अशा वेळी मालिकेत पराभव होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. कारण वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला ७ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता.
वन डे मालिकेसाठी टीम इंडिया
शिखर धवन (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युजवेंद्र सिंह, चहल. कुलदीप यादव.
वन डे मालिकेसाठी न्यूझीलंड संघ
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन, टिम साउथी, अॅडम मिल्ने, मॅट हेन्री, टॉम लॅथम.