Join us  

Cricket Records in India, IND vs NZ 2nd T20: Suryakumar Yadav , Hardik Pandya ... एकापेक्षा एक धडाकेबाज.... तरीही भारतात पहिल्यांदाच T20 मध्ये घडला विचित्र प्रकार

सामन्यात तब्बल २३९ चेंडूंचा खेळ झाला, तरीही 'ते' घडलंच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 11:52 AM

Open in App

Cricket Records in India, IND vs NZ 2nd T20: भारताने दुसऱ्या टी२० सामन्यात न्यूझीलंडचा सहा गडी राखून पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत न्यूझीलंडला केवळ ९९ धावांवर रोखले. पण या छोटाशा धावसंख्येचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या फलंदाजांचीही दमछाक झाली. लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर रविवारी दुसरा सामना झाला. त्यात फलंदाजांना धावा करताना खूप कष्ट पडले. फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवले. न्यूझीलंडने प्रथम खेळताना २० षटके खेळली आणि भारतालाही १०० धावा करण्यासाठी १९.५ षटके खेळावी लागली. या सामन्यात एक अशी गोष्ट घडली जी भारतात खेळल्या गेलेल्या टी२० क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली.

असं पहिल्यांदाच घडलं....

एका टी२० सामन्यात एकही षटकार न मारण्याची ही भारतातील पहिलीच वेळ ठरली. म्हणजेच या खेळपट्टीवर फलंदाजी करणे किती कठीण गेले असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. या सामन्यात १४ चौकार मारले गेले, पण एकाही फलंदाजाला षटकार मारता आला नाही. दोन्ही संघांकडे एकाहून एक धडाकेबाज फलंदाज होते, तरीही कोणालाच षटकार मारता आला नाही. सामन्यात पहिल्या डावातील २० षटके आणि दुसऱ्या डावातील १९.५ षटके मिळून एकून २३९ चेंडू टाकण्यात आले. त्यापैकी एकाही चेंडूवर षटकार मारणे कोणत्याही फलंदाजाला जमलं नाही. टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांबद्दल बोलायचे तर ICCच्या पूर्ण सदस्य देशांच्या सामन्यांमध्ये यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. आणि संपूर्ण देशांच्या यादीत बघायचे झाले तर, यापूर्वी मीरपूरमध्ये बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात २३८ चेंडूच्या खेळात एकही षटकार मारला गेलेला नव्हता, तो विक्रम या सामन्यात मोडला गेला.

सामन्यात काय घडलं?

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून मिचेल सँटनरने फलंदाजीचा निर्णय घेतला. अर्शदीप सिंगने दोन गडी बाद केले. त्याशिवाय इतर प्रत्येक गोलंदाजाने प्रत्येकी एक विकेट घेतली. शिवम मावीला मात्र विकेट घेता आली नाही. न्यूझीलंडकडून कर्णधार सँटनरने सर्वाधिक १९ धावा केल्या. त्याच्याशिवाय एकाही खेळाडूला १५ धावांचा आकडा पार करता आला नाही. १०० धावांचे लक्ष्य सहज गाठले जाईल, असे साऱ्यांनाच वाटले. पण तसे झाले नाही. मायकल ब्रेसवेलने शुभमन गिलला बाद केले. इशान किशन आणि वॉशिंग्टन सुंदर धावबाद झाले. राहुल त्रिपाठीही स्वस्तात बाद झाला. अखेर कर्णधार हार्दिक पांड्या आणि उपकर्णधार सूर्यकुमार यादव या जोडीने ३१ धावांची भागीदारी करत, भारताला विजय मिळवून दिला. सूर्यकुमार यादवने सामन्यातील सर्वाधिक वैयक्तिक २६ धावांची खेळी केली. मालिकेतील शेवटचा सामना १ फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडसूर्यकुमार अशोक यादवहार्दिक पांड्याभारतीय क्रिकेट संघ
Open in App