India vs New Zealand, 2nd T20I Live Updates : न्यूझीलंडच्या १५४ धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी शतकी भागीदारी करून टीम इंडियाच्या विजयाचा मजबूत पाया रचला. लोकेश-रोहित जोडीनं आजच्या या खेळीनं अनेक पराक्रम नोंदवले. या दोघांच्या वैयक्तिक अर्धशतकांनी भारताचा विजय पक्का केला. भारतानं या सामन्यात विजयासह मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. घरच्या मैदानावरील भारतानं सलग पाचवी ट्वेंटी-२० मालिका जिंकली आहे.
भारतीय गोलंदाजांनी कमालीची कामगिरी करताना फ्रंटसिटवर बसलेल्या न्यूझीलंडच्या संघाला बॅकफूटवर फेकले. मार्टीन गुप्तीलच्या स्फोटक सुरुवातीनंतर किवींनी पॉवर प्लेमध्ये १ बाद ६४ धावा केल्या होत्या, परंतु त्यापुढील १४ षटकांत त्यांना ५ बाद ८९ धावा करता आल्या. मार्टीन गुप्तील ( ३१), डॅरील मिचेल ( ३१), ग्लेन फिलिप्स ( ३४), मार्क चॅपमॅन ( २१) आणि टीम सेइफर्ट ( १३) यांनी योगदान दिले. भारताचा फिरकीपटू आर अश्विन यानं त्याच्या चार षटकांत १९ धावांत १ विकेट घेतली. हर्षलनं २५ धावांत २ विकेट्स घेतल्या. भुवनेश्वर कुमार, दीपक चहर आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.न्यूझीलंडनं ६ बाद १५३ धावा केल्या.
प्रत्युत्तरात रोहित शर्मा व लोकेश राहुल या जोडीनं कोणतीच कसर सोडली नाही. या जोडीनं न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. सलग पाच सामन्यांत ५०+ भागीदारी करण्याचा भारतीय जोडीचा पहिला मान त्यांनी पटकावला. तर ट्वेंटी-२०त १०००+ धावा करणारी ही दुसरी भारतीय दोडी ठरली. कॅलेंडर २०२१ वर्षात त्यांची ही पाचवी ५०+ धावांची भागीदारी ठरली आणि त्यांनी शिखर धवन व रोहित शर्मा यांचा २०१८चा विक्रम मोडला. रोहित शर्मानं या सामन्यात ४५० आंतरराष्ट्रीय षटकाराचा विक्रम पूर्ण करताना पाकिस्तानचा माजी फलंदाज शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडला. रोहितनं ४०४ डावांमध्ये हा पराक्रम केला, तर आफ्रिदीला ४८७ डाव खेळावे लागले. ख्रिस गेल ( ५५३) व आफ्रिदी ( ४७६) यांच्यानंतर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकारांमध्ये रोहित तिसऱ्या क्रमांकावर आहे.
१८व्या षटकात गोलंदाजी करायला आलेल्या जिमी निशॅमच्या पहिल्या दोन चेंडूंतर सलग षटकार खेचून भारताला ७ विकेट्स व १६ चेंडू राखून विजय मिळवून दिला.