India vs New Zealand, 2nd T20I Live Updates : मार्टीन गुप्तीलनं ज्या आक्रमकतेनं सुरुवात केली, ती पाहता न्यूझीलंड आज धावांचा डोंगर उभा करेल असे वाटले होते. पण, भारतीय गोलंदाजांनी १०व्या षटकानंतर सामन्यावर हळुहळू पकड घेण्यास सुरुवात केली अन् किवींच्या धावांना लगाम लावला. आर अश्विननं कंजूस गोलंदाजी केली, तर पदार्पणात हर्षल पटेलनं आपली छाप सोडली. भारतीय गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीमुळे टीम इंडियानं सामन्यात कमबॅक केले. भारतीय संघाच्या कामगिरीवर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) हाही खूश झाला.
कर्णधार रोहित शर्मानं ( Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.दव फॅक्टरमुळे या खेळपट्टीवर गोलंदाजी करणं अवघड जात होते आणि त्याचाच फायदा पहिल्या षटकापासून मार्टीन गुप्तीलनं ( Martin Guptil) उचलला. भुवनेश्वर कुमारच्या पहिल्या षटकात त्यानं १४ धावा कुटल्या. गुप्तीलनं पहिल्या दोन चेंडूवर चौकार खेचून इरादा स्पष्ट केला. चौथा चेंडू त्यानं मिड ऑफच्या दिशेनं उत्तुंग उडवला, लोकेशनं उलट धाव घेत तो टिपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. चेंडू लोकेशच्या हातात विसावलाच होता, परंतु जमिनीवर आदळताच तो सुटला अन् गुप्तीलला जीवदान मिळालं. त्यानंतर गुप्तील सुसाट सुटला.
भुवीन टाकलेल्या चौथ्य षटकातही त्यानं १३ धावा जोडल्या. गुप्तीलनं ट्वेंट-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विराट कोहलीचा विक्रम मोडला. गुप्तील ३२३०* धावांसह अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्यानं विराटचा ३२२७ धावांचा विक्रम मोडला. रोहित शर्मा ( ३०८६) हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण, दीपक चहरनं ५व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर गुप्तीलला बाऊन्सर टाकून झेलबाद केले. पहिल्या चेंडूवर गुप्तीलनं षटकार खेचला होता. पहिल्या सामन्यातही चहरनं पहिला चेंडू षटकार गेल्यानंतर पुढील चेंडूवर गुप्तीलची विकेट घेतली होती. गुप्तील १५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार खेचून ३१ धावांवर बाद झाला.
गुप्तील बाद झाल्यावर किवींच्या धावांचा वेग मंदावला. पहिल्या सामन्यातील अर्धशतकवीर मार्क चॅपमॅन यानं धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला, परंतु अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर लोकेश राहुलनं सीमारेषेवर सुरेख झेल टिपला. चॅपमॅन २१ धावांवर माघारी फिरला. किवींच्या १० षटकात २ बाद ८४ धावा झाल्या होत्या. पदार्पणवीर हर्षल पटेलनं भारताला तिसरं यश मिळवून दिलं. डॅरील मिचेल ३१ धावांवर सूर्यकुमार यादवच्या हाती झेल देऊन माघारी परतला. किवींनी १३व्या षटकात शतकी पल्ला ओलांडला. अक्षर पटेलनं ४ षटकांत २६ धावा देत १ विकेट घेतली. टीम सेइफर्ट व ग्लेन फिलिप्स यांना धावांचा वेग वाढवता आला नाही.
आर अश्विनला रिव्हर्स स्वीप मारण्य़ाच्या प्रयत्नात सेइफर्ट ( १३) झेलबाद झाला.
हर्षलनं दुसरी विकेट घेताना फिलिप्सला ३४ धावांवर बाद केले. भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या षटकांत उत्तम गोलंदाजी करताना किवींना बॅकफूटवर फेकले. हर्षलनं २५ धावांत २ विकेट्स घेतल्या. किवींना २० षटकांत ६ बाद १५३ धावा करता आल्या.
Web Title: IND vs NZ, 2nd T20I Live Updates: India need to chase 154 to seal the series, An excellent comeback by Indian bowlers
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.