India vs New Zealand, 2nd T20I Live Updates : कर्णधार रोहित शर्मानं ( Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात मोहम्मद सिराजला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली, तर IPL 2021मधील पर्पल कॅप विजेत्या हर्षल पटेलनं ( Harshal Patel) पदार्पण केलं. न्यूझीलंडनंही मालिकेत बरोबरी मिळवण्यासाठी आजच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहे. दव फॅक्टरमुळे या खेळपट्टीवर गोलंदाजी करणं अवघड जात होते आणि त्याचाच फायदा पहिल्या षटकापासून मार्टीन गुप्तीलनं ( Martin Guptil) उचलला. भुवनेश्वर कुमारच्या पहिल्या षटकात त्यानं १४ धावा कुटल्या. चौथ्या चेंडूवर मिड ऑफला टोलवलेला चेंडू झेलण्यात लोकेश राहुलला अपयश आलं अन् पुढच्याच चेंडूवर चौकार खेचून गुप्तीलनं वर्ल्ड रिकॉर्डची नोंद करताना विराट कोहलीला ( Virat Kohli) मागे टाकले.
आयपीएल २०२१त ३२ विकेट्स घेऊन इतिहास रचणाऱ्या हर्षल पटेलला ( Harshal Patel) यानं आजच्या सामन्यातून पदार्पण केलं. भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकर याच्या हस्ते हर्षलला टीम इंडियाची कॅप दिली गेली. भारताकडून ट्वेंटी-२०त पदार्पण करणारा हर्षल पटेल हा सहावा वयस्कर खेळाडू ठरला. राहुल द्रविडनं ३८ वर्ष व २३२ दिवसांचा असताना ट्वेंटी-२०त पदार्पण केलं होतं. त्यानंतर सचिन तेंडुलकर ( ३३ वर्ष व २२१ दिवस), श्रीनाथ अरविंद ( ३१ वर्ष व १७७ दिवस), स्टुअर्ट बिन्नी ( ३१ वर्ष व ४४ दिवस), मुरली विजय ( ३१ वर्ष व ३९ दिवस) आणि हर्षल पटेल ( ३० वर्ष व ३६१ दिवस) असा क्रमांक येतो.
गुप्तीलनं पहिल्या दोन चेंडूवर चौकार खेचून इरादा स्पष्ट केला. चौथा चेंडू त्यानं मिड ऑफच्या दिशेनं उत्तुंग उडवला, लोकेशनं उलट धाव घेत तो टिपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. चेंडू लोकेशच्या हातात विसावलाच होता, परंतु जमिनीवर आदळताच तो सुटला अन् गुप्तीलला जीवदान मिळालं. त्यानंतर गुप्तील सुसाट सुटला. भुवीन टाकलेल्या चौथ्य षटकातही त्यानं १३ धावा जोडल्या. गुप्तीलनं ट्वेंट-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विराट कोहलीचा विक्रम मोडला. गुप्तील ३२३०* धावांसह अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्यानं विराटचा ३२२७ धावांचा विक्रम मोडला. रोहित शर्मा ( ३०८६) हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.
पण, दीपक चहरनं ५व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर गुप्तीलला बाऊन्सर टाकून झेलबाद केले. पहिल्या चेंडूवर गुप्तीलनं षटकार खेचला होता. पहिल्या सामन्यातही चहरनं पहिला चेंडू षटकार गेल्यानंतर पुढील चेंडूवर गुप्तीलची विकेट घेतली होती. ( Deepak Chahar has picked Martin Guptill twice in two games in this T20i series.)