India vs New Zealand, 2nd T20I Live Updates : भारतीय गोलंदाजांनी कमालीची कामगिरी करताना फ्रंटसिटवर बसलेल्या न्यूझीलंडच्या संघाला बॅकफूटवर फेकले. मार्टीन गुप्तीलच्या स्फोटक सुरुवातीनंतर किवींनी पॉवर प्लेमध्ये १ बाद ६४ धावा केल्या होत्या, परंतु त्यापुढील १४ षटकांत त्यांना ५ बाद ८९ धावा करता आल्या. या सामन्यातून पदार्पण करणाऱ्या हर्षल पटेलनं ( Harshal Patel) सर्वाधिक २ विकेट्स घेत, सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला. या सामन्यातून मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) यानं रवी शास्त्री व विराट कोहली यांनी खंडीत केलेली परंपरा पुन्हा सुरू केली आणि महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी कौतुक केलं.
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडनं ६ बाद १५३ धावा केल्या. मार्टीन गुप्तील ( ३१), डॅरील मिचेल ( ३१), ग्लेन फिलिप्स ( ३४), मार्क चॅपमॅन ( २१) आणि टीम सेइफर्ट ( १३) यांनी योगदान दिले. भारताचा फिरकीपटू आर अश्विन यानं त्याच्या चार षटकांत १९ धावांत १ विकेट घेतली. हर्षलनं २५ धावांत २ विकेट्स घेतल्या. भुवनेश्वर कुमार, दीपक चहर आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. पदार्पणवीर हर्षल पटेल म्हणाला,''देशाची जर्सी घालण्याच्या भावना काही वेगळीच असते. या खेळावर प्रेम करता म्हणून तुम्ही खेळायला सुरुवात करता आणि तेव्हा तुमच्यासमोर टीम इंडिया हेच ध्येय असते. मी स्वतःला वचन दिले होते की मी स्वतःला गृहीत धरणार नाही. राहुलभाईंनी मला सांगितले, की तुझा सराव झाल्यानंतर इथे ये आणि खेळाचा आस्वाद लुट. स्थानिक क्रिकेटमधील ९-१० वर्ष, आयपीएलनंतर मी इथवर पोहोचलो. याचे मला खूप समाधान आहे.''
हर्षल पटेलला माजी गोलंदाज अजित आगरकर याच्याकडून पदार्पणाची कॅप देण्यात आली. अनिल कुंबळे यांनी त्यांच्या प्रशिक्षकपादाच्या कार्यकाळात पदार्पणवीराला माजी खेळाडूंच्या हस्ते कॅप देण्याची प्रथा सुरू केली होती. पण, शास्त्री व कोहली यांच्या कार्यकाळात त्यात खंड पडला अन् आज द्रविडनं ती पुन्हा सुरू केली, असे सुनील गावस्कर समालोचन करताना म्हणाले.