India vs New Zealand, 2nd T20I Live Updates : न्यूझीलंडच्या १५४ धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी शतकी भागीदारी करून टीम इंडियाच्या विजयाचा मजबूत पाया रचला. लोकेश-रोहित जोडीनं आजच्या या खेळीनं अनेक पराक्रम नोंदवले, परंतु रोहित शर्मानं पाकिस्तानचा माजी फलंदाज शाहिद आफ्रिदी याचा मोठा विक्रम मोडला.
भारतीय गोलंदाजांनी कमालीची कामगिरी करताना फ्रंटसिटवर बसलेल्या न्यूझीलंडच्या संघाला बॅकफूटवर फेकले. मार्टीन गुप्तीलच्या स्फोटक सुरुवातीनंतर किवींनी पॉवर प्लेमध्ये १ बाद ६४ धावा केल्या होत्या, परंतु त्यापुढील १४ षटकांत त्यांना ५ बाद ८९ धावा करता आल्या. या सामन्यातून पदार्पण करणाऱ्या हर्षल पटेलनं ( Harshal Patel) सर्वाधिक २ विकेट्स घेत, सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला. मार्टीन गुप्तीलनं ज्या आक्रमकतेनं सुरुवात केली, ती पाहता न्यूझीलंड आज धावांचा डोंगर उभा करेल असे वाटले होते. पण, भारतीय गोलंदाजांनी १०व्या षटकानंतर सामन्यावर हळुहळू पकड घेण्यास सुरुवात केली अन् किवींच्या धावांना लगाम लावली.
कर्णधार रोहित शर्मानं ( Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.दव फॅक्टरमुळे या खेळपट्टीवर गोलंदाजी करणं अवघड जात होते आणि त्याचाच फायदा पहिल्या षटकापासून मार्टीन गुप्तीलनं ( Martin Guptil) उचलला. भुवनेश्वर कुमारच्या पहिल्या षटकात त्यानं १४ धावा कुटल्या. दीपक चहरनं ५व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर गुप्तीलला बाऊन्सर टाकून झेलबाद केले. गुप्तील १५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार खेचून ३१ धावांवर बाद झाला. डॅरील मिचेल ३१ धावांवर सूर्यकुमार यादवच्या हाती झेल देऊन माघारी परतला. अक्षर पटेलनं ४ षटकांत २६ धावा देत १ विकेट घेतली. टीम सेइफर्ट व ग्लेन फिलिप्स यांना धावांचा वेग वाढवता आला नाही. आर अश्विनला रिव्हर्स स्वीप मारण्य़ाच्या प्रयत्नात सेइफर्ट ( १३) झेलबाद झाला. हर्षलनं दुसरी विकेट घेताना फिलिप्सला ३४ धावांवर बाद केले. हर्षलनं २५ धावांत २ विकेट्स घेतल्या. किवींना २० षटकांत ६ बाद १५३ धावा करता आल्या.
प्रत्युत्तरात रोहित शर्मा व लोकेश राहुल या जोडीनं कोणतीच कसर सोडली नाही. या जोडीनं न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. सलग पाच सामन्यांत ५०+ भागीदारी करण्याचा भारतीय जोडीचा पहिला मान त्यांनी पटकावला. तर ट्वेंटी-२०त १०००+ धावा करणारी ही दुसरी भारतीय दोडी ठरली. कॅलेंडर २०२१ वर्षात त्यांची ही पाचवी ५०+ धावांची भागीदारी ठरली आणि त्यांनी शिखर धवन व रोहित शर्मा यांचा २०१८चा विक्रम मोडला. रोहित शर्मानं या सामन्यात ४५० आंतरराष्ट्रीय षटकाराचा विक्रम पूर्ण करताना पाकिस्तानचा माजी फलंदाज शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडला. रोहितनं ४०४ डावांमध्ये हा पराक्रम केला, तर आफ्रिदीला ४८७ डाव खेळावे लागले. ख्रिस गेल ( ५५३) व आफ्रिदी ( ४७६) यांच्यानंतर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकारांमध्ये रोहित तिसऱ्या क्रमांकावर आहे.
लोकेश व रोहित यांची ११७ धावांची भागीदारी टीम साऊदीनं संपुष्टात आणली. लोकेश ४९ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ६५ धावांवर झेलबाद झाला.
Web Title: IND vs NZ, 2nd T20I Live Updates : Rohit Sharma is the fastest to reach 450 international sixes, He reached the milestone in just 404 innings, surpassing Shahid Afridi's 487 innings record.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.