पुण्याच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा पहिला डाव २५९ धावांत आटोपला. आर. अश्विन याने आघाडीच्या तिघांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर उरलेल्या सर्व विकेट्स वॉशिंग्टन सुंदरनं आपल्या खात्यात जमा केल्या. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताकडून एका डावात सर्वच्या सर्व १० विकेट्स ऑफ स्पिनरनं घेतल्याचे पाहायला मिळाले.
पहिल्या ३ विकेट्स अश्विनला; उरलेल्या ७ विकेट्स वॉशिंग्टनच्या नावे
न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार टॉम लॅथम याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कर्णधारानं डेवॉन कॉन्वेच्या साथीनं न्यूझीलंडच्या पहिल्या डावाची सुरुवात केली. धावफलकावर ३२ धावा असताना अश्विननं न्यूझीलंड कॅप्टनच्या रुपात टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिले. दुसऱ्या बाजूनं डेवॉन कॉन्वे मैदानात तग धरून उभा राहिला. विल यंगसोबत त्याने ४४ धावांची भागीदारी रचली. ही जोडी सेट होतीये असे चित्र निर्माण झाले असताना अश्विन पुन्हा टीम इंडियाच्या मदतीला धावला. विल यंगला त्याने तंबूचा रस्ता दाखवला. कॉन्वेच्या रुपात अश्विननं वैयक्तिक आणि संघासाठी तिसरी विकेट घेतली. इथून पुढच्या सर्वच्या सर्व विकेट्स वॉशिंग्टन सुंदरला मिळाल्या.
न्यूझीलंडकडून दोघांची फिफ्टी
न्यूझीलंडच्या संघाकडून डेवॉन कॉन्वे याने १४१ चेंडूचा सामना करताना ११ चौकाराच्या मदतीने ७६ धावांची खेळी केली. ही किवींच्या ताफ्यातून आलेली पहिल्या डावातील सर्वोच्च खेळी ठरली. याशिवाय रचिन रविंद्र यानेही अर्धशतकी खेळी करत संघासाठी मोलाचे योगदान दिले. त्याने १०५ चेंडूत ५ चौकारआणि एका षटकाराच्या मदतीने ६५ धावांची खेळी केली. तळाच्या फलंदाजीत सँटनर याने ५१ चेंडूचा सामना करताना ३ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ३३ धावा केल्या.
पुण्याच्या मैदानात वॉशिंग्टन सुंदरचा जलवा!
३ वर्षांनी टीम इंडियात कमबॅकची संधी मिळालेल्या वॉशिंग्टन सुंदरनं कमालीची गोलंदाजी करताना न्यूझीलंडच्या ७ फलंदाजांना तंबूत धाडले. आतापर्यंत ४ कसोटी सामन्यात जेवढ्या विकेट्स मिळाल्या नव्हत्या तेवढ्या विकेट्स त्याने पहिल्या डावात आपल्या खात्यात जमा केल्या. २३.१ षटके गोलंदाजी करताना ५९ धावा कर्च करून त्याने ७ विकेट्स घेतल्या. यात ४ निर्धाव षटकांचाही समावेश आहे. ही कसोटी कारकिर्दीतील त्याची सर्वोच्च खेळीही आहे.