मुंबई : एकाग्रता राखून मोठी खेळी करण्याचा सल्ला कोच राहुल द्रविड यांनी दिला होता. आपल्या हातात असलेल्या अनेक गोष्टींवर नियंत्रण राखण्याचा त्यांचा कानमंत्र उपयुक्त ठरल्यामुळे नाबाद शतक झळकावू शकलो, असे मत सलामीवीर मयांक अग्रवाल याने व्यक्त केले.
१२० धावांवर नाबाद राहिल्यानंतर मयांक म्हणाला, ‘या सामन्याआधी दिग्गज सुनील गावसकर यांचे काही व्हिडिओ पाहिले. त्यानुसार खांद्याचा वापर करण्यात बदल केला. माझ्यासाठी हे तंत्र लाभदायी ठरले. अंतिम एकादशमध्ये निवड होताच मी द्रविड यांच्यासोबत संवाद साधला. ते म्हणाले, ‘जे तुझ्या हातात आहे त्यावर नियंत्रण राख, तसेच मैदानावर सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करीत राहा. चांगली सुरुवात झाल्यास मोठी खेळी करण्याकडे वाटचाल कर. मला जी सुरुवात लाभली त्याचे सोने करीत मी शतक ठोकू शकलो.’
बंगळुरूच्या या फलंदाजाने इंग्लंड दौऱ्यात डोक्याला जखम झाल्यामुळे दुर्दैवी ठरल्याबद्दल खंत व्यक्त केली. मयांक म्हणाला, ‘इंग्लंडमध्ये जखमी झाल्यामुळे काहीच करता आले नाही; पण मेहनत करीत राहिलो. स्वत:च्या खेळावर लक्ष केंद्रित केल्याचे आज फळ मिळाले.’ गावसकर यांनी समालोचनादरम्यान अग्रवालने बॅट पकडण्याच्या स्थितीत खांद्याचा वापर करण्याकडे लक्ष द्यायला हवे, असा सल्ला दिला होता. मयांकने त्यांचा सल्ला मनावर घेत मेहनत केली. तो म्हणाला, मी आधी बॅट वर ठेवत होतो. आता खाली ठेवायला लागलो आहे. व्हिडिओ पाहून खांद्याची स्थिती बदलताच लवकर तोडगा काढणे शक्य झाले. माझ्या मते, माझी आजची खेळी संयम आणि संकल्प यांचे मिश्रण ठरली. शिस्तबद्ध खेळूनच मोठी खेळी शक्य आहे, हा बोध घेऊ शकलो.
न्यूझीलंडला दुखापतीने ग्रासलेआधीच प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिलेल्या न्यूझीलंड संघाला दुसऱ्या कसोटीच्या सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. डाव्या हाताच्या कोपऱ्याला झालेल्या दुखापतीमुळे कर्णधार केन विलियम्सनला या सामन्यातून माघार घ्यावी लागली. त्याच्या अनुपस्थितीमध्ये सलामीवीर टॉम लॅथम याने किवी संघाचे नेतृत्व केले. विलियम्सनच्या जागी किवी संघाने डेरील मिशेलला खेळवले..
कोरोना निर्बंधानंतर मुंबईकरांचा अल्पप्रतिसादनाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर वानखेडे स्टेडियमवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून मिळालेल्या परवानगीनुसार २५ टक्के प्रेक्षकांची उपस्थिती अपेक्षित होती. मात्र, मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) एका पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी ३६०० प्रेक्षक उपस्थित राहिले होते. ३३ हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या वानखेडे स्टेडियमवर शनिवारी व रविवारी मिळालेल्या परवानगीनुसार प्रेक्षक संख्या वाढेल, अशी अपेक्षाही वर्तविण्यात आली आहे.