मुंबई : भारत - न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान वानखेडे स्टेडियमवर पहिल्यांदाच दोन महिला स्कोअरर आपली जबाबदारी पार पाडतील. क्षमा साने आणि सुषमा सावंत हे शुक्रवारपासून रंगणाऱ्या कसोटी सामन्यासाठी स्कोअरर म्हणून काम पाहतील. याआधी सौराष्ट्र येथे हेमाली देसाई आणि सेजल दवे या महिला स्कोअरर जोडीने कसोटी सामन्यासाठी स्कोअरिंग केले होते.४५ वर्षीय क्षमा या मुंबईतील नाहूरच्या रहिवासी आहेत. त्या २०१० साली बीसीसीआय स्कोअररची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. ५० वर्षीय सुषमा या क्षमा यांना साथ देतील. सुषमा या चेंबूरच्या रहिवासी असून, त्यांनी २०१० साली बीसीसीआयची स्कोअरिंगची परीक्षा उत्तीर्ण केली.
न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकण्यात थोडक्यात अपयश आल्यानंतर शुक्रवारपासून वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाने कंबर कसली आहे. नियमित कर्णधार विराट कोहलीचे पुनरागमन होणार असल्याने संघात उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, गेले दोन दिवस मुंबईत पावसाने हजेरी लावल्याने सामन्यावर संकटही निर्माण झाले आहे. त्यातच प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार कोहली यांच्यापुढे संघाचे संतुलन साधण्याचे मुख्य आव्हान आहे.