Join us  

आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?

बंगळुरू कसोटीत टीम इंडियाचा दारुण पराभव करुन किवी संघाने तब्बल ३६ वर्षांनंतर भारतात कसोटी जिंकली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 7:48 PM

Open in App

WTC 2025 : भारतीय क्रिकेट संघाचा विजयरथ रोखण्यात न्यूझीलंडच्या संघाला यश आले. बंगळुरू कसोटीत टीम इंडियाचा दारुण पराभव करुन किवी संघाने तब्बल ३६ वर्षांनंतर भारतात कसोटी जिंकली. सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताची अवस्था बिकट आहे. टॉम लॅथमच्या (८६ धावा) अर्धशतकाच्या बळावर न्यूझीलंडने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ५ बाद १९८ धावा केल्या आणि एकूण ३०१ धावांची आघाडी घेतली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत टॉम ब्लंडेल ३० आणि ग्लेन फिलिप्स नऊ धावांवर खेळत होते. सकाळी भारताचा पहिला डाव १५६ धावांवर आटोपला. न्यूझीलंडने पहिल्या डावात २५९ धावा केल्या. विशेष बाब म्हणजे खेळ असाच सुरू राहिला तर भारत सामना आणि मालिका दोन्ही गमावेल. भारताच्या या पराभवाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या गणितावर परिणाम होणार आहे.

दरम्यान, भारत सध्या १२ सामन्यांनंतर ६८.०६ टक्के गुणांसह जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) क्रमवारीत अव्वल आहे. ऑस्ट्रेलिया ६२.५० सह दुसऱ्या स्थानावर आहे, तर श्रीलंका ५५.५६ सह तिसऱ्या स्थानावर आहे. आगामी काळात खेळल्या जाणाऱ्या WTC च्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारत मजबूत स्थितीत असल्याचे दिसत आहे. मात्र, बंगळुरूतील निराशाजनक पराभवानंतर अंतिम फेरीचा मार्ग थोडा आव्हानात्मक बनला असून पुण्यात आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. जर भारताला न्यूझीलंडविरुद्ध सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले तर चांगलेच नुकसान होईल.

पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील एक सामना बाकी आहे. रोहित शर्माच्या संघाला इतर संघांच्या निकालावर विसंबून न राहता डब्ल्यूटीसी अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी उर्वरित सहा सामन्यांपैकी किमान चार सामने जिंकावे लागतील. तसे न झाल्यास भारताला इतर संघांवरदेखील अवलंबून राहावे लागेल. उदाहरणार्थ, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या साखळी सामन्यांमध्ये श्रीलंकेचा संघ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यांमधील निकालाचा परिणाम भारताच्या सलग तिसऱ्यांदा WTC अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शक्यतांवर होईल. भारताने न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावल्यास याचा थेट फायदा दक्षिण आफ्रिकेला होईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी आफ्रिकन संघाला पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध दक्षिण आफ्रिका मैदानात असेल.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारतीय क्रिकेट संघ