IND vs NZ, 2nd Test : भारतीय संघानं सोमवारी अवघ्या ४३ मिनिटांत न्यूझीलंडच्या पाच फलंदाजांना माघारी पाठवून दुसरी कसोटी जिंकली. भारतानं ठेवलेल्या ५४० धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा दुसरा डाव १६७ धावांवर गडगडला.भारतानं हा सामना ३७२ धावांनी जिंकला. भारताच्या पहिल्या डावातील ३२५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव ६२ धावांवर गडगडला. भारतानं ७ बाद २७६ धावांवर दुसरा डाव घोषित केला होता. भारतानं ही मालिका १-० अशी जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC Final) इंग्लंडमध्ये झालेल्या अंतिम सामन्यातील पराभवाची सव्याज परतफेड केली. भारतानं या विजयासह न्यूझीलंडकडून आयसीसी जागतिक कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थानही हिसकावले.
वानखेडेवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारताकडून मयांक अग्रवाल ( १५०), शुबमन गिल ( ४४) व अक्षर पटेल ( ५२) यांनी दमदार खेळ केला. मयांकनं दुसऱ्या डावातही ( ६२) अर्धशतकी खेळी केली. चेतेश्वर पुजारा ( ४७), गिल ( ४७), विराट कोहली ( ३६) व अक्षर पटेल ( ४१*) यांनी दमदार खेळ केला. गोलंदाजीत आर अश्विननं दोन्ही डावांत ८ , अक्षर पटेलनं ४, जयंत यादवनं ५ व मोहम्मद सिराजनं ३ विकेट्स घेतल्या. या कामगिरीच्या जोरावर भारतानं कसोटी क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले.
भारतानं १२४ गुणांसह अव्वल स्थान काबीज केलं. य मालिकेपूर्वी भारताच्या खात्यात ११९ गुण होते, तर किवींच्या खात्यात १२१ गुण होते. भारतानं १-० अशा विजयासह ५ गुणांची भर घालताना किवींना दुसऱ्या क्रमांकावर ढकलले.