ind vs nz test series : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना २४ ऑक्टोबरपासून पुण्यात खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यातील पराभवामुळे दुसरा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सलामीच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली पण कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी घेऊन मोठी चूक केली. टीम इंडिया अवघ्या ४६ धावांत गडगडली. त्यामुळे पुणे कसोटीत टीम इंडिया नवीन रणनीतीसह मैदानात उतरेल. रिपोर्ट्सनुसार, पुण्यातील खेळपट्टीसाठी काळ्या मातीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे फिरकीपटूंना अधिक मदत मिळेल असे अपेक्षित आहे. म्हणूनच भारतीय कर्णधार तीन फिरकीपटूंना संघात स्थान देऊ शकतो. आर अश्विन, रवींद्र जेडजा आणि कुलदीप यादव हे त्रिकुट एकत्र खेळताना दिसू शकते. बंगळुरू कसोटीतदेखील भारताची अशीच काहीशी रणनीती होती. मात्र, सतत आभाळ आल्याने आणि पावसाच्या व्यत्ययामुळे एम चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी पोषक ठरली. भारत पहिल्या डावात अवघ्या ४६ धावांत सर्वबाद होण्यामागे हे देखील एक कारण असल्याचे बोलले जाते.
महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये (MCA) तिसऱ्यांदा कसोटी सामना होत आहे. २०१६-१७ मध्ये सर्वप्रथम इथे कसोटी सामना झाला होता, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने यजमान भारताला तब्बल ३३३ धावांनी पराभूत केले होते. त्या सामन्यात फिरकीपटूंचा बोलबाला राहिला होता. खेळपट्टीवर असलेल्या भेगा यामुळे चेंडूला वळण घेण्यास मदत झाली. पहिल्या दिवसापासूनच फिरकीपटूंनी या संधीचा फायदा घेतला. या सामन्यातील ४० पैकी ३१ बळी फिरकीपटूंनी घेतले होते. परंतु, सामन्यानंतर रेफरींनी या खेळपट्टीला खराब पिच अशी रेटिंग दिली.
२०१९ मध्ये दुसऱ्यांदा पुण्यात कसोटी सामन्याचा थरार रंगला. यावेळी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत झाली, ज्यामध्ये विराट कोहलीने द्विशतक झळकावताना २५४ धावा केल्या. भारताने हा सामना एक डाव आणि १३७ धावांनी जिंकला. या सामन्यातही पहिल्या दिवसापासूनच फिरकीपटूंना मदत मिळत गेली. त्यामुळे टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरू शकते.
दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर.