Join us  

IND vs NZ : टीम इंडियाला आणखी एक धक्का! सलग दुसऱ्या पराभवाचे सावट; पंतसह विराटही ढेपाळला

IND vs NZ 2nd Test live match updates : रिषभ पंत पाठोपाठ विराट कोहलीदेखील स्वस्तात बाद झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 1:33 PM

Open in App

IND vs NZ 2nd Test | पुणे : भारत दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाने सलग दुसऱ्या सामन्यात यजमानांची डोकेदुखी वाढवली. बंगळुरू कसोटीत मोठा विजय मिळवून किवी संघाने विजयी सलामी दिली. सध्या पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात या मालिकेतील दुसरा सामना होत आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून २५९ धावा केल्या, भारताकडून फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने कमाल करताना पाहुण्यांची कोंडी केली. मात्र, भारताला आपल्या पहिल्या डावात अपेक्षित कामगिरी करता आली नाही आणि टीम इंडिया अवघ्या १५६ धावांत गडगडली. 

भारताची खराब फलंदाजी... त्यामुळे मिळालेल्या आघाडीचा फायदा घेत न्यूझीलंडने आपल्या दुसऱ्या डावात संयमी खेळी केली. त्यांना २५५ धावा करता आल्या. त्यामुळे टीम इंडियाला मालिकेत बरोबरी साधण्यासाठी अर्थात सामना जिंकण्यासाठी ३५९ धावांची आवश्यकता आहे. पण, दुसऱ्या डावात टीम इंडिया पुन्हा एकदा अडचणीत सापडली. यशस्वी जैस्वालने स्फोटक खेळी करताना ६५ चेंडूत ७७ धावा कुटल्या, तर रोहित शर्मा (८) आणि शुबमन गिल (२३) धावा करुन तंबूत परतला. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला त्याच्या चुकीमुळे खातेही उघडता आले नाही. मिचेल सँटनरने चांगला थ्रो करुन पंतला बाहेरचा रस्ता दाखवला. 

पंत बाद झाल्यानंतर टीम इंडियाची धुरा विराट कोहलीच्या खांद्यावर होती. मात्र, किंग कोहली अवघ्या १७ धावांत मिचेल सँटनरच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू बाद झाला. आता वॉशिंग्टन सुंदर आणि सर्फराज खान यांच्यावर मोठी भागीदारी करण्याची जबाबदारी आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस असल्याने भारतीय संघाकडे खूप वेळ असला तरी न्यूझीलंडच्या फिरकीपटूंपासून वाचण्याचे आव्हानही आहे. आताच्या घडीला भारताला विजयासाठी २०० हून अधिक धावांची गरज आहे.  

टॅग्स :रिषभ पंतभारत विरुद्ध न्यूझीलंडविराट कोहली