India vs New Zealand, 2nd Test Live Update : मयांक अग्रवालचे दीडशतक आणि अक्षर पटेलच्या अर्धशतकी खेळीवर न्यूझीलंडचा गोलंदाज एजाझ पटेल ( Ajaz Patel) यानं पाणी फिरवलं. जिम लेकर व अनिल कुंबळे यांच्यानंतर कसोटीत एका डावात १० विकेट्स घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. इंग्लंडच्या जिम लेकर यांनी १९५६मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मँचेस्टर कसोटीत एका डावात १० विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर भारताच्या अनिल कुंबळेनं १९९९मध्ये पाकिस्तानविरुद्ध १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. एजाझनं ४७.५ षटकांत ११९ धावांत १० विकेट्स घेतल्या. त्यानं १२ निर्धाव षटकंही फेकली.
मयांक अग्रवाल (Mayank Agarwal ) व शुबमन गिल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवले. मयांक व शुबमन गिल यांनी टीम इंडियाला ८० धावांची भागीदारी उभारून दिली, परंतु ३ फलंदाज पटापट माघारी परतले. गिल ७१ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ४४ धावांवर झेलबाद झाला. चेतेश्वर पुजारा पुन्हा अपयशी ठरला. कर्णधार विराट कोहलीला चूकीच्या निर्णयाचा फटका बसला. पण, मयांकनं श्रेयस अय्यर व वृद्धीमान सहा यांच्यासह टीम इंडियाचा डाव सावरला पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या ४ बाद २२१ धावा झाल्या होत्या.
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात एजाझ पटेलनं सहाला ( २७) पायचीत केलं अन् पुढच्याच चेंडूवर आर अश्विनला अप्रतिम चेंडूवर त्रिफळाचीत केलं. घेतल्यानंतर किवी खेळाडू जल्लोष करत असताना अश्विन DRSची मागणी करताना दिसला. आपण नेमकं कसं बाद झालोय, हेच त्याला कळेनासे झाले होते. अक्षर पटेलनं किवी गोलंदाज पटेलची हॅटट्रिक मात्र हुकवली. अक्षर व मयांक यांनी सातव्या विकेटसाठी दमदार खेळ केला. ही जोडी तोडण्यासाठी टीम साऊदी, कायले जेमिन्सन, विलियम सोमरविले या सर्वांनी प्रयत्न केले, परंतु अखेर यश एजाझ पटेललाच मिळाले. त्यानं लंच ब्रेकनंतर पटेलनं मोठी विकेट घेतली. मयांक ३११ चेंडूंत १७ चौकार व ४ षटकारांसह १५० धावांवर माघारी परतला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक तीनवेळा १५०+ धावा करण्याचा रोहित शर्माच्या विक्रमाशी मयांकनं बरोबरी केली.
प्रतिस्पर्धीच्या घरच्या मैदानावर आघाडीच्या सात फलंदाजाला एकाच गोलंदाजानं बाद करण्याची ही दुसरी वेळ ठरली. याआधी २००२मध्ये मुथय्या मुरलीधरन यानं झिम्बाब्वेविरुद्ध असा पराक्रम केला होता. अक्षरनं आक्रमक खेळ सुरू करताना सोमरविलेला ४,६,३ असे चोपले. अक्षरनं ११३ चेंडूंत कसोटीतील पहिले अर्धशतक पूर्ण केले. पण, एजाझनं पुन्हा खोडा घातला, अक्षरला ५२ धावांवर पायचीत करून ८वी विकेटही नावावर केली. न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेटमधील ही दुसरी सर्वोत्तम गोलंदाजी ठरली. यापूर्वी १९८५मध्ये रिचर्ड हेडली यांनी ब्रिस्बेन कसोटीत ५२ धावांत ९ विकेट्स घेतल्या होत्या. किवीच्या एकाही गोलंदाजाला आजपर्यंत ७ पेक्षा अधिक विकेट घेता आल्या नाही. एजाझनं तोही पराक्रम करून दाखवला. भारताविरुद्ध न्यूझीलंडच्या गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. एजाझनं ९वी विकेटही नावावर केली. एजाझनं १० विकेट्स घेताना ऐतिहासिक कामगिरी केली. भारताचा पहिला डाव ३२५ धावांवर गुंडाळला.