IND vs NZ, 2nd Test Live Update : मयांक अग्रवालच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजवलं. १२ वाजता सुरू झालेल्या या सामन्यात विराट कोहलीचे पुनरागमन झालं आणि नाणेफेक जिंकून त्यानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मयांक व शुबमन गिल या जोडीनं पहिल्या विकेटसाठी ८० धावा जोडल्या. पण, न्यूझीलंडच्या अजाझ पटेलनं याच धावसंख्येवर टीम इंडियाला तीन धक्के दिले. मयांक व श्रेयस अय्यरनं अर्धशतकी खेळ करून गाडी रुळावर आणली अन् त्यानंतर मयांकनं शतक पूर्ण केलं. या सामन्यात भारतानं तीन बदल केले, त्यापैकी एक बदल हा उप कर्णधार अजिंक्य रहाणे याचा होता.
सामन्याच्या दिवशी अजिंक्यला ही दुखापत झाली अन् त्यानं कसोटीतून माघार घेतली. त्याच्यासह इशांत शर्मा व रवींद्र जडेजा यांनीही दुखापतीमुळे माघार घेतली. इशांत शर्मा याच्या डाव्या हाताच्या करंगळीला कानपूर कसोटीच्या अखेरच्या दिवशी दुखापत झाली होती. भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याच्याही उजव्या हाताला दुखापत झाली आहे आणि त्याच्या हाताला सूज आली आहे, त्यामुळे त्याला विश्रांतीचा सल्ला दिला गेला. रहाणे याच्याही मांडीचे स्नायू ताणले गेल्यानं माघार घेतली. महान फलंदाज व्ही व्ही एस लक्ष्मण यानंही या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं. त्यात अजिंक्य पहिल्या दिवसातील अखेरच्या सत्रातील ड्रिंक्स ब्रेकमध्ये स्वतः फलंदाजांसाठी पाणी घेऊन आल्यानं, अजिंक्यच्या दुखापतीबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
काय म्हणाला लक्ष्मण?
''आज सकाळी हे सर्व जखमी झालेत का?, कारण काल झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीनं काही सांगितले नाही. टीम इंडियासाठी हा मोठा धक्का आहे. इंग्लंड मालिकेत जडेजाला दुखापत झाली आणि अक्षर पटेलची एन्ट्री झाली. त्यानं त्या मालिकेत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. ज्याप्रकारे त्यानं गोलंदाजी केली, ते अप्रतिम होतं. आता विराट कोहलीच्या जागी संधी मिळालेल्या श्रेयस अय्यरनं संघ प्रचंड दडपणात असतानाही अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली. त्यामुळे भारतीय संघाकडे तगडे पर्याय आहेत.''
या दुखापतीमुळे विराट कोहलीचा प्लेइंग इलेव्हन निवडण्याचं काम सोपं केल्याचंही लक्ष्मणला वाटतं. तो म्हणाला,'' मयांक अग्रवालचे संघातील स्थान कायम राहील. अजिंक्य रहाणेच्या दुखापतीमुळे फलंदाजांमध्ये बदल करण्याची गरज नाही. विराट कोहली त्याच्या जागी खेळले. इशांत शर्माच्या जागी मोहम्मद सिराज याला संधी मिळेल, परंतु रवींद्र जडेजाच्या जागी कोणाला संधी मिळेल?; जयंत यादव संघात असल्यानं भारतीय संघ अतिरिक्त फिरकीपटूसह खेळेल किंवा एक अतिरिक्त फलंदाज खेळवेल. हे नाणेफेकीच्या वेळेस कळेल.''