India vs New Zealand, 2nd Test Live Update : मयांक अग्रवाल व शुबमन गिल यांनी टीम इंडियाला दमदार सुरूवात करून दिल्यानंतर न्यूझीलंडच्या अजाझ पटेल ( Ajaz Patel) यानं सामनाच फिरवला. बिनबाद ८० धावांवरून टीम इंडियाची अवस्था ३ बाद ८० अशी केली. चेतेश्वर पुजाराला DRS मुळे जीवदान मिळूनही तो भोपळ्यावर बाद झाला. त्याच षटकात पटेलनं टीम इंडियाला मोठा धक्का दिला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पहिलाच सामना खेळणाऱ्या विराटला भोपळ्यावर माघारी जावं लागलं. पण, त्याच्या या विकेटनं मोठा गोंधळ सुरू झाला आहे. विराटनं स्वतः डोक्यावर हात मारून घेतला.
सातत्यानं अपयशी ठरत असलेल्या पुजाराकडे साऱ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. ३०व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पुजारासाठी पटेलनं LBWची अपील केली. मैदानावरील पंचांनी नाबाद दिले आणि त्याविरोधात किवी खेळाडू तिसऱ्या अम्पायरकडे गेले. पण, त्यात पुजारा नाबाद असल्याचे स्पष्ट झाले अन् त्यांचा DRS वाया गेला. पण, पटेलनं टाकलेल्या पुढच्याच चेंडूवर पुजारानं पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु तो पॅडला लागून यष्टिंवर आदळला. त्यानंतर त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर विराटसाठी LBWची जोरदार अपील झाली. मैदानावरील अम्पायर अनिल चौधरी यांनी विराटला बाद दिले. त्यानंतर विराटनं लगेच DRS घेतला.
टिव्ही अम्पायर वीरेंद्र शर्मा यांनी अनेक वेळा रिप्ले पाहिला आणि त्यांनाही चेंडू आधी पॅडला लागलाय की बॅटला हेच स्पष्ट दिसले नाही. त्यामुळे त्यांनी मैदानावरील अम्पायरचा निर्णय कायम राखताना विराटला बाद दिले. यावेळी वीरेंद्र शर्मा यांनी बॉल ट्रॅकींग डिव्हाईस न पाहताच विराटला बाद दिल्याचेही दिसले. खरंच चेंडू पहिला पॅडला लागला होता की नाही, यावरून वाद सुरू झालाय. विराटनंही या निर्णयाची दाद मागितली अन् पेव्हेलियनमध्ये जाऊन रिप्ले पाहून डोक्यावर हात मारला.