India vs New Zealand, 2nd Test Live Update : विराट कोहलीनं ( Virat Kohli) पुनरागमनाच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत मागील दोन दिवस सुरू असलेल्या पावसाच्या खेळीमुळे भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ १२ वाजता सुरू झाला. मयांक अग्रवाल व शुबमन गिल यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा संयमानं सामना करताना अर्धशतकी भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. भारतीय संघात तीन, तर किवी संघात एक महत्त्वाचा बदल पाहायला मिळाला आहे. वानखेडे स्टेडियमवरील या सामन्यात आज असा विक्रम नोंदवला गेला, जो १३३ वर्षांत कधीच नोंदवला गेलेला नाही. त्यामुळे या सामन्याची क्रिकेट इतिहासात एका वेगळ्या विक्रमानं नोंद झाली आहे.
१८८८-८९ नंतर थेट २०२१-२२... झाला भारी विक्रम!दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत चार वेगवेगळे कर्णधार असल्याची ही दुसरी वेळ ठरली. याआधी दक्षिण आफ्रिकेत १८८८-८९ मध्ये झालेल्या पहिल्या कसोटी मालिकेत चार वेगवेगळ्या खेळाडूंनी संघाचे नेतृत्व सांभाळले होते. दक्षिण आफ्रिकेकडून ओवेन डनेल व विलियम मिल्टन यांनी, तर इंग्लंडकडून सी आयूब्रेय स्मिथ व माँटी बावडन यांनी कर्णधाराची भूमिका पार पाडली होती.
त्यानंतर भारत-न्यूझीलंड मालिकेत हा विक्रम झाला. पहिल्या कसोटीत अजिंक्य रहाणे व केन विलियम्सन कर्णधार होते, तर आजच्या सामन्यात विराट कोहली व टॉम लॅथम हे कर्णधार आहेत.