India vs New Zealand, 2nd Test Live Update : भारताच्या पहिल्या डावातील ३२५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव ६२ धावांवर गडगडला. एजाझ पटेलच्या ( Ajaz Patel) १० विकेट्स घेऊन इतिहास रचला. त्यानं ४७.५ षटकांत १२ निर्धाव षटकं फेकून ११९ धावांत १० विकेट्स घेतल्या. पण, प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांनी २८.१ षटकांत न्यूझीलंडचा पहिला डाव ६२ धावांवर गुंडाळला. मोहम्मद सिराजनं सुरुवातीला तीन धक्के दिले आणि त्यानंतर आर अश्विननं चार, अक्षर पटेलनं दोन व जयंत यादवनं १ विकेट घेतली. टीम इंडियाला पाहुण्यांना फॉलोऑन देण्याची संधी होती, परंतु टीम इंडियानं पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर असा निर्णय घेणे, महागात पडू शकते. परंतु त्यामागे तसंच कारणही आहे
४ बाद २२१ वरून भारतानं आज डावाची सुरूवात केली. परंतु दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात एजाझनं सहाला ( २७) पायचीत केलं अन् पुढच्याच चेंडूवर आर अश्विनला त्रिफळाचीत केलं. अक्षर व मयांक यांनी सातव्या विकेटसाठी दमदार खेळ केला. मयांक ३११ चेंडूंत १७ चौकार व ४ षटकारांसह १५० धावांवर एजाझच्या गोलंदाजीवर माघारी परतला. अक्षरनं ११३ चेंडूंत कसोटीतील पहिले अर्धशतक पूर्ण केले. पण, एजाझनं पुन्हा खोडा घातला, अक्षरला ५२ धावांवर पायचीत केले. त्यानंतर जयंत यादव व मोहम्मद सिराज यांची विकेट घेत एजाझनं इतिहास रचला. भारताचा पहिला डाव ३२५ धावांवर गुंडाळला. एजाझनं ४७.५ षटकांत ११९ धावांत १० विकेट्स घेतल्या. त्यानं १२ निर्धाव षटकंही फेकली.
केन विलियम्सनची उणीव न्यूझीलंडला प्रकर्षानं जाणवली. इशांत शर्माच्या जागी संघात स्थान पटकावलेल्या मोहम्मद सिराजनं पहिल्या स्पेलमध्ये ४ षटकांत १९ धावा देताना तीन विकेट्स घेतल्या. विल यंग, टॉम लॅथम व रॉस टेलर हे आघाडीचे फलंदाज माघारी पाठवून सिराजनं टीम इंडियासाठी विजयाचे दार उघडले. त्यानंतर भारतीय फिरकीपटूंनी कमाल केली. अक्षर पटेल व जयंत यादव धक्के देतच होते, परंतु अनुभव आर अश्विननं किवी फलंदाजांना गुंडाळले. किवींचा निम्मा संघ ३१ धावांवर माघारी परतला होता. त्यात अश्विनच्या दणक्यानं त्यांची अवस्था आणखी बिकट केली. फॉलोऑन टाळण्याची किवी फलंदाजांची धडपड पाहायला मिळाली. अश्विननं चार विकेट्स घेतल्या. किवींचा पहिला डाव ६२ धावांवर गडगडला. आशियाई देशाविरुद्ध किवींची ही निचांक कामगिरी ठरली. भारतानं पहिल्या डावात २६३ धावांची आघाडी घेतली.
या मालिकेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. १७ डिसेंबरपासून सुरू होणारा आफ्रिका दौरा आता २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांना आव्हानात्मक परिस्थितीत फलंदाजीचा सराव मिळावा यासाठी कर्णधार विराट कोहलीनं पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, क्षेत्ररक्षण करताना शुबमन गिल याच्या बोटाला चेंडू लागल्यानं चेतेश्वर पुजारा व मयांक अग्रवाल ही जोडी सलामीला आली आहे.