India vs New Zealand, 2nd Test Live Update : भारत-न्यूझीलंड यांच्यातला दुसरा कसोटी सामना आजपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. कानपूर कसोटीत न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी भारताला विजय मिळवू दिला नाही, त्यामुळे मुंबईत त्याचा वचपा काढण्याचा यजमानांचा प्रयत्न आहे. कर्णधार विराट कोहलीचे ( Virat Kohli) पुनरागमन झाल्यानं टीम इंडियाची ताकद आणखी वाढली आहे. पण, अंतिम ११मधील कोणाला बाहेर करावे, असा पेच निर्माण झाला आहे. मात्र, दोन्ही संघांना वेगळ्याच गोष्टीनं चिंतित केले आहे. मुंबईत मागील दोन दिवस पाऊस पडला आणि त्यामुळे या सामन्यावरही त्याचे परिणाम जाणवत आहे. ९ वाजता होणारी नाणेफेक अजूनही झालेली नाही आणि बीसीसीआयनं अपडेट्स दिले आहेत.
कानपूर येथे झालेल्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंडच्या अखेरच्या जोडीने संयमी फलंदाजी करताना सामना अनिर्णीत राखून भारताला विजय मिळवू दिला नाही. दुसऱ्या कसोटीसाठी कोहलीचे पुनरागमन होणार असल्याने भारतीय संघात काही बदल नक्कीच पाहण्यास मिळतील. हवामान खात्याने शुक्रवारीही पावसाची शक्यता वर्तविली असल्याने पहिल्या दिवशी खेळ होण्याची शक्यता कमी वर्तविली जात आहे. गुरुवारपर्यंत खेळपट्टी झाकून ठेवण्यात आली होती. अशा परिस्थितीत दोन्ही संघ परिस्थितीनुसार संघात बदल करतील. शिवाय यावेळी नाणेफेकीचा कौलही महत्त्वाचा ठरेल. पावसामुळे खेळपट्टी काहीशी ओलसर राहणार असल्याने वेगवान गोलंदाजांना फायदा होईल. यामुळे न्यूझीलंड संघ नील वॅगनरच्या रूपाने अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवू शकतो.
दुसरीकडे, काही प्रमुख खेळाडूंकडून विशेष करून फलंदाजांकडून अपेक्षित कामगिरी होत नसल्याने भारतीय संघात मोठे बदल पाहण्यात येऊ शकतील. त्यामुळे द्रविड आणि कोहली यांच्यापुढे संघाचे संतुलन राखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे कानपूर येथे कसोटी पदार्पण करत पहिल्या डावात शतक, तर दुसऱ्या डावात अर्धशतक करणाऱ्या मुंबईकर श्रेयस अय्यरचे संघातील स्थानही पक्के नाही. अजिंक्य रहाणे गेल्या १२ डावांत अपयशी ठरला आहे. चेतेश्वर पुजाराही फॉर्मात नाही. अशात विराटसाठी या तिघांपैकी एकाला बाहेर बसवले जाऊ शकते. कानपूर कसोटीत दुखापतग्रस्त झालेला वृद्धीमान सहा तंदुरूस्त झाल्याची माहिती विराटनं दिली त्यामुळे केएस भारतचे पदार्पण लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयनं दिलेल्या अपडेट्सनुसार ९.३० वाजता खेळपट्टीची पुन्हा पाहणी करण्यात येईल आणि त्यानंतर नाणेफेकीचा निर्णय होईल.
Web Title: IND vs NZ, 2nd Test Live Update : Update from Mumbai, The toss has been delayed. There will be a pitch inspection at 9:30 AM
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.