India vs New Zealand, 2nd Test Live Updates : भारतीय खेळाडूंनी दुसऱ्या डावातही दमदार कामगिरी करताना न्यूझीलंडसमोर तगडं आव्हान उभं केलं. मयांक अग्रवालनं दुसऱ्या डावातही अर्धशतकी खेळी केली, त्याला चेतेश्वर पुजारा, शुबमन गिल, अक्षर पटेल व विराट कोहली यांची तोडीसतोड साथ मिळाली. एजाझ पटेलनं याही डावात उल्लेखनीय कामगिरी करताना न्यूझीलंडच्या पदरात यशाचे थोडे थेंब टाकले आणि यावेळी त्याच्यासोबतीला राचिन रविंद्रही आला. पण, भारतानं उभं केलेलं आव्हान पार करणं न्यूझीलंडला जमणारं नाही.
भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीत निर्विवाद वर्चस्व राखले आहे. मयांक अग्रवाल ( १५०), अक्षर पटेल ( ५२) व शुबमन गिल ( ४४) यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियानं पहिल्या डावात ३२५ धावा केल्या. न्यूझीलंडचा गोलंदाज एजाझ पटेल ( Ajaz Patel) यानं भारताच्या १० फलंदाजांना बाद करून विक्रमी कामगिरी केली. जिम लेकर व अनिल कुंबळे यांच्यानंतर कसोटीत एका डावात १० विकेट्स घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. पण, त्याच्या या मेहनतीवर किवी फलंदाजांनी पाणी फिरवले. न्यूझीलंडचा पहिला डाव भारतीय गोलंदाजांनी अवघ्या ६२ धावांवर गुंडाळला. आऱ अश्विननं चार, मोहम्मद सिराजनं ३, अक्षर पटेलनं दोन व जयंत यादवनं एक विकेट घेतली.
कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कॅच घेण्याच्या प्रयत्नात शुबमन गिलनं बोटाला दुखापत करून घेतली आणि त्यामुळे चेतेश्वर पुजारा व मयांक अग्रवाल ही जोडी सलामीला आली. भारतानं Follow on न देता पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पुजारा व मयांक यांनी पहिल्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी करून भारताची आघाडी आणखी मजबूत केली. पहिल्या डावात १० विकेट्स घेणाऱ्या एजाझनं तिसऱ्या दिवशी भारताला पहिला धक्का दिला. मयांक १०८ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारांसह ६२ धावांवर माघारी परतला. मयांकचा परतलेला फॉर्म हा टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा ठरला आहे. आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर मयांकनं त्याचं स्थान पक्क केलं आहे.
तिसऱ्या दिवसाची दुसरी विकेटही एजाझच्या नावावर राहिली. त्यानं चेतेश्वर पुजाराला ( ४७) बाद केलं. या विकेटसह न्यूझीलंडकडून एकाच कसोटीत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांत एजाझनं चौथे स्थान पटकावलं. विराट कोहली व शुबमन गिल या जोडीनं न्यूझीलंडची डोकेदुखी वाढवली. या जोडीनं आक्रमक खेळी करताना तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. राचिन रविंद्रनं ही जोडी तोडली. गिल पुन्हा एकदा अर्धशतकाला मुकला, तो ४७ धावांवर झेलबाद झाला.
एजाझनं भारताचा चौथा धक्का देताना श्रेयस अय्यर ( १४) याला बाद केले. टॉम ब्लंडलनं चतुराईनं स्टम्पिंग केली. राचिनच्या फिरकीचा अंदाज घेण्यात विराट ( ३६) चुकला अन् चेंडू बॅटला लागून यष्टींवर आदळल्यानं तो माघारी परतला. अक्षर पटेलनं त्यानंतर चौफेर फटकेबाजी केली. भारतानं ७ बाद २७६ धावांवर दुसरा डाव घोषित केला. अक्षर २६ चेंडूंत ४१ धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडसमोर विजयासाठी ५४० धावांचे लक्ष्य आहे.