India vs New Zealand, 2nd Test Live Updates : न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाझ पटेलनं (Ajaz Patel) भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत १० विकेट्स घेत विश्विविक्रम केला. जिम लेकर व अनिल कुंबळे यांच्यानंतर कसोटीत एका डावात १० विकेट्स घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. पण, प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज आहे. एजाझच्या या कामगिरीचं साऱ्यांनीच कौतुक केलं. हा सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) उपस्थित होते. एजाझच्या कामगिरीचं त्यांनीही ट्विट करून कौतुक केलं.
एजाझनं ११९ धावा देताना १० विकेट्स घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्धची डावातील ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. यापूर्वी १९७१मध्ये जॅक नॉरेगा ( वेस्ट इंडीज) यांनी ९५ धावांत ९ विकेट्स घेतल्या होत्या. त्यापाठोपाठ फ्रेड ट्रूमन ( ८- ३१, १९५२), लान्स गिब्स ( ८-३८, १९६२) व नॅथन लियॉन ( ८-५०, २००७) यांचा क्रमांक येतो. प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावरील एजाझची ही कामगिरी सर्वोत्तम ठरली. यापूर्वी हा विक्रम जॉर्ज लोहमन यांनी १८९६मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २८ धावांत ९ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर रिचर्ड हेडली ( ९-५२ वि. ऑस्ट्रेलिया, १८९५), मुथय्या मुरलीधरन ( ९-६५ वि. इंग्लंड, १९९८) व सर्फराज नवाझ ( ९-८६ वि. ऑस्ट्रेलिया, १९७९) यांचा क्रमांक येतो.
विश्वविक्रमी कामगिरी करणाऱ्या एजाझचे पवारांनी कौतुक केले. त्यांनी ट्विट केलं की,''कसोटीत एकाच डावात दहा विकेट्स घेण्याची अविश्वसनीय कामगिरी केल्याबद्दल एजाझ पटेलचे अभिनंदन. त्याचा जन्म मुंबईचा आणि तो आता न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करतोय. अशी कामगिरी करणारा तो जगातील तिसराच गोलंदाज आहे.''