India vs New Zealand, 2nd Test Live Updates : भारतानं दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. भारतानं दुसरा डाव ७ बाद २७६ धावांवर घोषित करून ५३९ धावांची भक्कम आघाडी घेतली. किवी संघाची दुसऱ्या डावातही घसरगुंडी उडाली. आर अश्विनचे चेंडू जबरदस्त फिरकी घेताना दिसले. त्यानं सुरुवातीलाच तीन धक्के देत किवींना बॅकफूटवर फेकले. हेन्री निकोल्स व डॅरील मिचेल यांच्या ७३ धावांच्या भागीदारीनं न्यूझीलंडचा पराभव चौथ्या दिवसावर ढकलला. पण, दिवसअखेर त्यांचा निम्मा संघ माघारी परतला आहे.
कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कॅच घेण्याच्या प्रयत्नात शुबमन गिलनं बोटाला दुखापत करून घेतली आणि त्यामुळे चेतेश्वर पुजारा व मयांक अग्रवाल ही जोडी सलामीला आली. भारतानं Follow on न देता पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पुजारा व मयांक यांनी पहिल्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी केली. त्यानंतर पुजारा ४७ धावांवर बाद झाला. शुमबनला पुन्हा अर्धशतकानं हुलकावणी दिली. तो ४७ धावांवर माघारी फिरला. मयांक ६२, विराट ३६ धावा करून बाद झाले. अक्षर पटेलनं २६ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकार खेचून नाबाद ४१ धावांची खेळी केली. एजाझ पटेलनं १०६ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. राचिन रविंद्रनं ३ बळी टीपत त्याला चांगली साथ दिली.
न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक राहिली. टॉम लॅथम अवघ्या ६ धावांवर बाद झाला. आर अश्विननं ही विकेट घेतली आणि त्यानंतर लगेचंच टी ब्रेक घ्यावा लागला. स्पायडर कॅमेरा मैदानावर अडकल्यानं १५ मिनिटे आधीच ब्रेक घ्यावा लागला. टी ब्रेकनंतर आर अश्विननं किवींना आणखी दोन धक्के दिले. विल यंग ( २०) व रॉस टेलर ( ६) यांना माघारी पाठवून अश्विननं २०२१मध्ये कसोटीत ५०+ विकेट्स पूर्ण केल्या. कॅलेंडर वर्षात सर्वाधिक ४ वेळा ५०+ कसोटी विकेट्स घेण्याचा विक्रमही अश्विनच्या नावावर झाला. त्यानं २०१५, २०१६ व २०१७ ला असा पराक्रम केला होता. त्यानं अनिल कुंबळे ( १९९९, २००४ व २००६) आणि हरभजन सिंग ( २००१, २००२ व २००८) यांचा विक्रम मोडला.
हेन्री निकोल्स व डॅरील मिचेल यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगला सामना केला. मिचेलनं वैयक्तिक अर्धशतकासह निकोल्सह अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांची ७३ धावांची भागीदारी अक्षर पटेलनं तोडली. डॅरील मिचेलला ६० धावांवर माघारी जावं लागलं. त्यानंतर आलेल्या टॉम ब्लंडलनं घाई केली आणि त्यालाही भोपळ्यावर धावबाद होऊन माघारी जावं लागलं. न्यूझीलंडनं तिसऱ्या दिवसअखेर ५ बाद १४० धावा केल्या आहेत आणि त्यांना विजयासाठी दोन दिवसांत ४०० धावा बनवायच्या आहेत. भारताला मालिका खिशात घालण्यासाठी ५ विकेट्स हव्या आहेत.
Web Title: IND vs NZ, 2nd Test Live Updates : New Zealand at 140/5 on Day 3 Stumps, India need 5 wickets to win the series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.