India vs New Zealand, 2nd Test Live Updates : भारतानं दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. भारतानं दुसरा डाव ७ बाद २७६ धावांवर घोषित करून ५३९ धावांची भक्कम आघाडी घेतली. मयांक अग्रवालची बॅट पुन्हा एकदा तळपली. यावेळेस त्याला शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अक्षर पटेल व विराट कोहली यांची साथ मिळाली. भारताच्या पहिल्या डावातील ३२५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव ६२ धावांवर गडगडला. किवी गोलंदाज पहिल्या डावात १० विकेट्स घेणाऱ्या एजाझ पटेलनं दुसऱ्या डावातही ४ विकेट्स घेतल्या. पण, तिसऱ्या दिवसाचा चहापानाचा ब्रेक १५ मिनिटं आधी घ्यावा लागला आणि त्यामागे विचित्र कारण होतं.
कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कॅच घेण्याच्या प्रयत्नात शुबमन गिलनं बोटाला दुखापत करून घेतली आणि त्यामुळे चेतेश्वर पुजारा व मयांक अग्रवाल ही जोडी सलामीला आली. भारतानं Follow on न देता पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पुजारा व मयांक यांनी पहिल्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी केली. त्यानंतर पुजारा ४७ धावांवर बाद झाला. शुमबनला पुन्हा अर्धशतकानं हुलकावणी दिली. तो ४७ धावांवर माघारी फिरला. मयांक ६२, विराट ३६ धावा करून बाद झाले. अक्षर पटेलनं २६ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकार खेचून नाबाद ४१ धावांची खेळी केली. एजाझ पटेलनं १०६ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. राचिन रविंद्रनं ३ बळी टीपत त्याला चांगली साथ दिली.
न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक राहिली. टॉम लॅथम अवघ्या ६ धावांवर बाद झाला. आर अश्विननं ही विकेट घेतली आणि त्यानंतर लगेचंच टी ब्रेक घ्यावा लागला. स्पायडर कॅमेरा मैदानावर अडकल्यानं १५ मिनिटे आधीच ब्रेक घ्यावा लागला.