India vs New Zealand, 2nd Test Live Updates : भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या मुंबई कसोटीचा दुसरा दिवस गोलंदाजांनी गाजवला. न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाझ पटेल ( Ajaz Patel) यानं भारताच्या दहाही फलंदाजांना बाद करून क्रिकेट इतिहासात त्याचं नाव सुवर्णाक्षरानं लिहिलं. जिम लेकर व अनिल कुंबळे यांच्यानंतर कसोटीत एका डावात १० विकेट्स घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. पण, प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज आहे. एजाझच्या या कामगिरीचं साऱ्यांनीच कौतुक केलं, मग अशात भारतीय टीम मागे कशी राहिल. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार विराट कोहली आणि गोलंदाज मोहम्मद सिराज हे थेट किवी ड्रेसिंग रुममध्ये पोहोचले आणि त्यांनी तिथे जाऊन एजाझ पटेलचे अभिनंदन केले. विराट, राहुल व सिराजचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारतीय खेळाडूंच्या खिलाडूवृत्तीचं सारेच कौतुक करत आहेत.
एजाझ पटेलचे विक्रम
- कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्धची डावातील ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. यापूर्वी १९७१मध्ये जॅक नॉरेगा ( वेस्ट इंडीज) यांनी ९५ धावांत ९ विकेट्स घेतल्या होत्या. त्यापाठोपाठ फ्रेड ट्रूमन ( ८- ३१, १९५२), लान्स गिब्स ( ८-३८, १९६२) व नॅथन लियॉन ( ८-५०, २००७) यांचा क्रमांक येतो.
- प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावरील एजाझची ही कामगिरी सर्वोत्तम ठरली. यापूर्वी हा विक्रम जॉर्ज लोहमन यांनी १८९६मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २८ धावांत ९ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर रिचर्ड हेडली ( ९-५२ वि. ऑस्ट्रेलिया, १८९५), मुथय्या मुरलीधरन ( ९-६५ वि. इंग्लंड, १९९८) व सर्फराज नवाझ ( ९-८६ वि. ऑस्ट्रेलिया, १९७९) यांचा क्रमांक येतो.
- कसोटी क्रिकेटमधील ही तिसरी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. जिम लेकर यांनी १९५६मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५३ धावांत १० विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर अनिल कुंबळे यांनी १९९९मध्ये पाकिस्तानविरुद्ध ७४ धावांत १० विकेट्स घेतल्या. आज एजाझनं ११९ धावांत १० विकेट्स घेतल्या.