India vs New Zealand, 2nd Test Live Updates : भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीत यजमानांनी विजयाच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. भारतानं समोर ठेवलेल्या ५४० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडनं तिसऱ्या दिवशीच पाच विकेट्स गमावल्या होत्या. त्यात चौथ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात जयंत यादवनं आणखी एक यश मिळवून दिलं. पण, कसोटीच्या तिसऱ्या दिवशी एक विचित्र योगायोग पाहायला मिळाला. भारताच्या दोन यष्टिरक्षकांनी मिळून न्यूझीलंडच्या यष्टिरक्षकाला बाद केले. जाणून घेऊया हे नेमकं कसं काय घडले...
भारताच्या पहिल्या डावातील ३२५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव ६२ धावांवर गडगडला. भारतानं फॉलो ऑन न देता पुन्हा फलंदाजी करताना ७ बाद २७६ धावांवर दुसरा डाव घोषित केला. टॉम लॅथमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडला हे आव्हान पेलवणं तितकं सोप जाणार नाही, हे कळून चुकले. त्यात आर अश्विननं दुसऱ्या डावात सुरुवातीलाच तीन धक्के दिल्यानं त्यांची अवस्था आणखी बिकट झाली. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक राहिली. टॉम लॅथम ( ६), विल यंग ( २०) व रॉस टेलर ( ६) यांना आर अश्विननं माघारी पाठवून किवींना मोठे धक्के दिले. हेन्री निकोल्स व डॅरील मिचेल यांनी
भारतीय गोलंदाजांचा चांगला सामना केला. मिचेलनं वैयक्तिक अर्धशतकासह निकोल्सह ७३ धावांची भागीदारी केली , परंतु अक्षर पटेलनं ही जोडी तोडली. डॅरील मिचेलला ६० धावांवर माघारी जावं लागलं. त्यानंतर आलेल्या टॉम ब्लंडलनं घाई केली आणि त्यालाही भोपळ्यावर धावबाद होऊन माघारी जावं लागलं. अक्षर पटेलनं टाकलेल्या ३७व्या षटकात किवी यष्टिरक्षक टॉम ब्लंडल या उगाच एक धाव घेण्यासाठी धावला, पण नॉन स्ट्राइक एंडला असलेल्या हेन्री निकोल्सनं त्याला माघारी जाण्यास सांगितले. इतक्यात बदली खेळाडू म्हणून क्षेत्ररक्षणासाठी आलेल्या केएस भारतनं वेगानं थ्रो वृद्धीमान सहाकडे दिला अन् त्यानं लगेच रन आऊट केलं. अशा प्रकारे भारताच्या दोन यष्टिरक्षकांनी मिळून किवींच्या यष्टिरक्षकाला बाद केलं. पाहा व्हिडीओ...