Join us  

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य

India vs New Zealand 2nd Test: फिरकीच्या मदतीने बरोबरी साधण्याची यजमानांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 6:34 AM

Open in App

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बंगळुरूतील पहिल्या कसोटीत अनपेक्षितपणे पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आजपासून (गुरुवार) पुण्यात गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर रंगणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडला रोखण्याच्या निश्चयानेच मैदानावर उतरेल. एमसीएची खेळपट्टी भारताची स्थिती पाहून तयार करण्यात आली आहे. खेळपट्टीवर गवत नसून ती काळ्या मातीने तयार केली आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांचे चेंडू बंगळुरूप्रमाणे येथे उसळी घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे फिरकीपटूंच्या मदतीने भारतीय संघ मालिकेत बरोबरी साधण्याचा कसोशीने प्रयत्न करेल. मात्र, भूतकाळात अशा खेळपट्ट्या भारतावर बूमरेंग झाल्या आहेत. तसेच अंतिम संघ निवड करताना मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संघ व्यवस्थापन यांची डोकेदुखी वाढणार आहे.

स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या भारताला संतुलित संघ निवडण्याच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. भारतीय संघ बंगळुरूमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात केवळ ४६ धावांत गारद झाला होता. दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी केल्यानंतरही भारताला आठ गड्यांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भारत तीन सामन्यांच्या मालिकेत ०-१ असा पिछाडीवर पडला आहे. भारत जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या यादीत अव्वल क्रमांकावर कायम आहे. पण, पहिल्या सामन्यातील पराभवामुळे त्यांना काही गुण गमवावे लागले आहेत. पुढील महिन्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याआधी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध पुढील दोन सामन्यांत शानदार कामगिरी करावी लागणार आहे.

शुभमन गिल संघात परतण्यास सज्ज आहे. लोकेश राहुल आणि सर्फराज खान यांच्यापैकी एकाला शुभमनसाठी जागा सोडावी लागणार आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर राहुलला अधिक संधी देण्याच्या बाजूने आहेत. पण, सर्फराजने बंगळुरूत दुसऱ्या डावात १५० धावांची खेळी करत संघातील जागेवर दावा केला आहे. वरिष्ठ फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. कोहलीने २०१९मध्ये याच मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद २५४ धावांची शानदार खेळी केली होती.

अश्विन, जडेजा, सुंदर यांच्यावर मोठी जबाबदारी

पुण्यातील खेळपट्टीवर फिरकीला साथ मिळाली तर रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा त्याचा पूर्ण फायदा घेतील. वॉशिंग्टन सुंदरचा समावेशही भारतासाठी निर्णायक ठरेल. त्यामुळे भारताची फलंदाजीही मजबूत होणार आहे.

पुण्यात एक पराभव, एक विजय

गहुंजे स्टेडियमवर आतापर्यंत दोन कसोटी सामने खेळविण्यात आले आहेत. त्यात भारताला एक विजय आणि एका पराभवाचा सामना करावा लागला आहे. २०१७मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटीत भारताला ३३३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता; तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१९मध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने एक डाव १३७ धावांनी विजय मिळवला होता.

सामन्याचा आनंद लुटायचा की उन्हाचा?

गहुंजे स्टेडियमवर भारत-न्यूझीलंड सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना कडाक्याच्या उन्हाचा सामना करावा लागणार आहे. गहुंजे स्टेडियमवर अच्छादित नसल्याने अनेकांना उन्हात बसूनच सामना पाहावा लागणार आहे. ऑक्टोबर हीटचा कडाका वाढल्याने चाह्मीलुपारच्या वेळेत सामन्याकडे पाठ फिरवतील अस्त शक्यता आहे. सामन्यासाठी ४९९, १५०० आणि ४००० रुपये किंमतीची तिकिटे आहेत. 

गंभीर बनले राहुलची ढाल

गौतम गंभीर यांनी पुन्हा एकदा मधल्या फळीतील फलंदाज लोकेश राहुल याच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले आहे. समाजमाध्यमांवरील टीकेला महत्त्व देत नाही. तसेच या टीकेमुळे संघनिवडही प्रभावित होत नाही. लोकेश राहुलमध्ये मोठी खेळी साकारण्याची पूर्ण क्षमता आहे. त्यामुळेच संघाचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे, असेही ते म्हणाले.

वॉशिंग्टन सुंदरमुळे भारतीय संघ होईल संतुलित

अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर हा गुणी खेळाडू आहे. त्याचा समावेश केल्यामुळे भारतीय संघ संतुलित होण्यास मदत होईल, असे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी म्हटले आहे. तसेच आगामी व्यस्त वेळापत्रकाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या कसोटीनंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यावरील ताण कमी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गंभीर म्हणाले की, वॉशिंग्टनने रणजीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मधली फळी मजबूत करण्याचे आणि संघाला संतुलन देण्याचे काम त्याच्यामुळे होणार आहे. पहिल्या कसोटीत ऋषभ पंत जखमी झाला होता. त्यामुळे ध्रुव जुरेलला यष्ठिरक्षण करावे लागले होते. गंभीर म्हणाले की, ऋषभ पंत पूर्णपणे तदुरुस्त झाला असून, तो न्यूझीलंडविरुद्ध दुसरी कसोटी खेळण्यास सज्ज आहे. त्याच्या तंदुरुस्तीबावत कोणतीही चिता नाही. महिनाभरावर ऑस्ट्रेलिया दौरा आल्यामुळे बुमराहला दुसऱ्या कसोटीनंतर विश्रांती देण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही गभीर यानी सगितले.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, सर्फराझ खान, लोकेश राहुल, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, आकाशदीप, अक्षर पटेल, कुलदीप यादव.

न्यूझीलंड : टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल, मार्क चॅपमन, डेवन कॉन्वे, जेकब डफी, मॅट हेन्री, डेरिल मिशेल, विलियम ओरूरके, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद, मिचेल सेंटनर, ईश सोधी, टिम साउदी, विल यंग.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडआर अश्विनरवींद्र जडेजागौतम गंभीरलोकेश राहुलसर्फराज खान