- रोहित नाईक
(थेट वानखेडेवरुन ‘लोकमत’साठी लाईव्ह...)
मुंबई : सातत्यपूर्ण कामगिरीच्या अभावामुळे टीका सहन करावी लागलेल्या सलामीवीर मयांक अग्रवालने अखेर आपला दर्जा दाखवला. त्याने दिलेल्या एकाकी लढ्याच्या जोरावर भारताने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर न्यूझीलंडविरुद्ध ७० षटकांत चार बाद २२१ धावांची मजल मारली. न्यूझीलंडचा भारतीय वंशाचा फिरकीपटू एजाझ पटेल याने भारतीय फलंदाजीला हादरे दिले. त्याने ७३ धावांमध्ये चार खंदे फलंदाज बाद करत भारतावर प्रचंड दडपण आणले होते. मयांकने चौथे कसोटी शतक झळकावताना २४६ चेंडूंत १४ चौकार व ४ षटकारांसह नाबाद १२० धावांची खेळी केली.
गेले दोन दिवस मुंबईत पडलेल्या पावसामुळे वानखेडे स्टेडियमचे मैदान ओलसर राहिल्याने सामना निर्धारित वेळेपेक्षा अडीच तास उशिराने सुरू झाला. सामन्यातील पहिले सत्र पूर्णपणे वाया गेल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शुभमन गिल आणि मयांक यांनी कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवताना ८० धावांची दमदार सलामी दिली. दोघे भारताला भक्कम सुरुवात करून देणार असे दिसत असतानाच पटेलने भारतीय फलंदाजीला सुरुंग लावला.
पटेलने आधी २८व्या षटकात शुभमन गिलला बाद केल्यानंतर ३०व्या षटकांत चेतेश्वर पुजारा आणि कोहली यांना भोपळाही फोडू दिला नाही. यामुळे भारताचा डावा बिनबाद ८० धावांवरून ३ बाद ८० धावा असा घसरला. गिलने मयांकला चांगली साथ देताना ७१ चेंडूंत सात चौकार व एका षटकारासह ४४ धावा केल्या. दमदार सुरुवातीचा फायदा घेण्यात त्याला पुन्हा अपयश आले. गिलसह पुजारा आणि कोहली पाठोपाठ बाद झाल्याने भारतीयांवर प्रचंड दडपण आले. त्यातच कोहलीचा बळी संशयास्पद ठरल्याने पुन्हा एकदा पंचांच्या कामगिरीवर प्रश्न निर्माण झाले. या दडपणाच्या स्थितीतून भारताला बाहेर आणले ते मयांकने. त्याने मुंबईकर श्रेयस अय्यरसह चौथ्या गड्यासाठी ८० धावांची भागीदारी केली. यामध्ये अय्यरचे योगदान केवळ १८ धावांचे राहिले. मयांकने आक्रमणाची सूत्रे आपल्याकडे घेत किवी गोलंदाजांना जोरदार प्रत्युत्तर दिले. विशेष म्हणजे ८० धावांनी पहिले तीन बळी गेल्यानंतर चौथा बळीही योगायोगाने ८० धावांनीच पडला. पुन्हा एकदा पटेलने किवींना यश मिळवून देत अय्यरला बाद केले. अय्यरने ४१ चेंडूंत तीन चौकारांसह १८ धावा केल्या.
अय्यर परतल्यानंतर मैदानात आलेल्या रिद्धिमान साहाने आक्रमक पवित्रा घेत भारताच्या धावगतीला वेग दिला. दोघांनी पाचव्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी करत भारताला मजबूत स्थितीत आणले. पटेल ज्याप्रकारे खेळपट्टीकडून मिळत असलेल्या मदतीचा फायदा घेत मारा केला, तसा मारा करण्यात इतर गोलंदाजांना अपयश आल्याने किवी संघाला मजबूत पकड मिळवता आली नाही.
मायदेशातील कसोटी सामन्यात एकाच डावात तिसऱ्या (पुजारा) व चौथ्या (कोहली) क्रमांकावरील फलंदाज शून्यावर बाद होण्याची तिसरी वेळ. याआधी असे १९५१-५२ साली इंग्लंडविरुद्ध कानपूर येथे, तर १९९४-९५ साली वेस्ट इंडिजविरुद्ध मुंबई येथे झाले होते.
विराट कोहली बाद की नाबाद?
३० व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर पटेलने कोहलीविरुद्ध पायचितचे अपील केल्यानंतर पंचांनी बाद असल्याचा निर्णय देताच कोहलीने लगेच डीआरएस घेतला. यावेळी तिसऱ्या पंचांचीही कसोटी लागली. चेंडू बॅट व पॅडच्या अगदी मधोमध लागल्याने पंचही गोंधळात पडले. मात्र, अखेर तिसऱ्या पंचांनी बादचा निर्णय दिल्यानंतर किवी खेळाडूंनी जल्लोष केला, तर कोहलीने मैदानी पंचांकडे नाराजी व्यक्त करताना नाइलाजाने मैदान सोडले.
विराटला ‘शंकेचा लाभ’ मिळायला हवा होता!
कर्णधार विराट कोहलीला मैदानी पंचाने पायचित बाद दिले. रिप्लेत चंडू आधीधी बॅटवर लागला की पडॅवर हे स्पष्ट होत नसेल तर अशा स्थितीत विराटला शंकेचा लाभ मिळायला हवा होता.
फॅन्स, दिग्गजही भडकले...
विराट वादग्रस्त निर्णयाचा बळी ठरताच त्याचे चाहते आणि काही माजी दिग्गज पंचांवर चांगलेच भडकले. माजी सलामीवीर वसीम जाफर याने ट्विट केले,‘ माझ्यामते येथे कॉमनसेन्सचा वापर होणे गरजेचे होते. पण म्हणतात ना, कॉमन सेन्स फार कॉमन ठरत नाही !’ पार्थिव पटेल म्हणाला,‘ विराट चक्क नाबाद होता. न्यूझीलंडने पकड निर्माण केली असेल पण विराटच्या वादग्रस्त निर्णयाचा त्यांना लाभ झाला.’ व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला,‘ कोहली बाद नव्हता. चेंडू बॅट आणि पॅडवर एकाचवेळी लागत नसेल तर निर्णय फलंदाजाच्या बाजुने जायला हवा.’
चार वेळा शून्यावर बाद
कोहली एका कॅलेंडर वर्षात चौथ्यांदा कसोटीत शून्यावर बाद झाला. वर्षभरात सर्वाधिक वेळा भोपळा न फोडता बाद होणारा खेळाडू म्हणून त्याच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली. याआधी बिशन बेदी (१९७६) कपिल देव (१९८३),महेंद्रसिंग धोनी (२०११) हे कर्णधार म्हणून एका वर्षात चारवेळा शून्यावर बाद झाले होते.
टी-२० मालिकेतील तिन्ही सामन्यानंतर दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये भारताने न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेकीचा कौल जिंकला आहे.
विराट कोहली दहाव्यांदा शून्यावर बाद होणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला. न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग सर्वाधिक १३ वेळा शून्यावर बाद झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा स्मिथही दहावेला शून्यावर बाद झाला आहे.
पहिले सत्र वाया
भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात एकाही चेंडूचा खेळ झाला नाही. मुंबईत दोन दिवस पडलेल्या पावसामुळे मैदान ओलसर झाले होते. यामुळे सामनाधिकारी व पंचांनी मैदानाची पाहणी करत पहिले सत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे सामना सकाळी ९.३० ऐवजी दुपारी १२ वाजता सुरु झाला.
दुखापतींचा फटका
सामन्याला सुरुवात होण्यास काही तासांचा अवधी असतानाच भारतीय संघाला दुखापतींनी ग्रासले असल्याची माहिती मिळाली. पहिल्या सामन्यात भारताचे कर्णधारपद सांभाळलेला अजिंक्य रहाणे, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे मुंबईत खेळू शकले नाही. विराट कोहली, मोहम्मद सिराज आणि जयंत यादव यांना अनुक्रमे रहाणे, इशांत व जडेजा यांच्या जागी संघात स्थान मिळाले. इशांतच्या डाव्या हाताच्या बोटाला पहिल्या सामन्यादरम्यान दुखापत झाली. जडेजाचा उजवा हात दुखावला होता. स्कॅन केल्यानंतर त्याची दुखापत काहीशी गंभीर असल्याचे निदान झाल्याने त्याला संघाबाहेर बसावे लागले. तसेच, पहिल्या कसोटीच्या अंतिम दिवशी क्षेत्ररक्षणादरम्यान स्नायू दुखावले. या तिघांच्या दुखापतींवर बीसीसीआयची वैद्यकीय टीम लक्ष ठेवून आहे.
धावफलक
भारत (पहिला डाव) : मयांक अग्रवाल खेळत आहे १२०, शुभमन गिल झे. टेलर गो. पटेल ४४, चेतेश्वर पुजारा त्रि गो. पटेल ०, विराट कोहली पायचीत गो. पटेल ०, श्रेयस अय्यर झे. ब्लंडेल गो. पटेल १८, रिद्धिमान साहा खेळत आहे २५. अवांतर - १४. एकूण : ७० षटकांत ४ बाद २२१ धावा. बाद क्रम : १-८०, २-८०, ३-८०, ४-१६०. गोलंदाजी : टीम साऊदी १५-५-२९-०; काएल जेमिसन ९-२-३०-०; एजाझ पटेल २९-१०-७३-४; विलियम सोमवरविले ८-०-४६-०; रचिन रवींद्र ४-०-२०-०; डेरील मिशेल ५-३-९-०
Web Title: IND Vs NZ, 2nd Test: Mayank's unbeaten century helped India recover, Ejaz Patel takes hosts' spin
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.