भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना पुण्यातील मैदानात रंगणार आहे. मालिका वाचावण्यासाठी टीम इंडियासाठी ही लढत खूपच महत्त्वाची असेल. या सामन्याआधी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने पत्रकारांशी संवाध साधला. यावेळी त्याने प्लेइंग इलेव्हन निवडणं ही एक मोठी कसोटी असल्याचे म्हटले आहे. बंगळुरु असो वा पुणे टीम निवडण्यासाठी खूप विचार करावा लागतो, असे तो म्हणाला आहे.
गंभीरला विचारण्यात आले रिषभ पंतशिवाय लोकेश राहुलसंदर्भातील प्रश्न
पुण्यातील मैदानात रंगणाऱ्या सामन्याआधी प्लेइंग इलेव्हनसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत. त्यातील रिषभ पंतच्या दुखापतीसह लोकेश राहुलला बाकावर बसवले जाईल, अशी चर्चा रंगताना दिसते. या दोन्ही मुद्यावर गौतम गंभीरला प्रश्न विचारण्यात आला होता. रिषभ पंत उत्तम असून तो पुण्याच्या मैदानात प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल, अशी माहिती गौतम गंभीरनं दिली. दुसरीकडे रोहित शर्मानंतर आता मुख्य प्रशिक्षक गंभीर लोकेश राहुलची पाठराखण करताना दिसले.
गंभीरकडून लोकेश राहुलची पाठराखण
लोकेश राहुलच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसला आहे. यावरून सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण त्याला ट्रोल करत आहेत. प्लेइंग इलेव्हनमध्ये तो बसत नाही असे बोलले जात आहे. यासंदर्भातील प्रश्नावर गंभीरनं मात्र लोकेश राहुलची पाठराखण केल्याचे पाहायला मिळाले. याआधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यानेही लोकेश राहुलवर विश्वास व्यक्त केला होता.
काय म्हणाला ंगंभीर?
लोकेश राहुलसंदर्भातील प्रश्नावर गंभीर म्हणाला की,
सोशल मीडियाच्या माध्यमातून प्लेइंग इलेव्हन निवडली जात नाही. सोशल मीडियावरील तज्ज्ञ काय म्हणतात ते महत्त्वाचे नाही. संघ व्यवस्थापन त्याच्याबद्दल काय विचार करते, ते अधिक महत्त्वाचे आहे. कानपूर कसोटीतील कठीण खेळपट्टीवर त्याने चांगली खेळी करून दाखवली आहे. तो मोठी खेळी करण्यासाठी उत्सुक आहे. संघ व्यवस्थापन पुढेही त्याच्या पाठिशी राहिल.
गंभीरनं केलेले हे वक्तव्य लोकेश राहुलला ट्रोल करणाऱ्या सोशल मीडियावरील मंडळींना टोला मारल्यासारखेच आहे. यामुळे पुन्हाएकदा लोकेश राहुल टीम इंडियातील 'लाडला' असल्याचे चित्र निर्माण करणारे आहे.