India vs New Zealand, 2nd Test : कानपूर कसोटीत न्यूझीलंड संघानं पराभव टाळला. टीम इंडियाला 27 षटकांत 4 फलंदाज माघारी पाठवण्यात अपयश आल्यामुळे न्यूझीलंडनं पहिली कसोटी अनिर्णीत राखली. आता दोन्ही संघांच्या नजरा मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटीकडे आहेत. ही कसोटी जिंकून मालिका खिशात घालण्याचा दोघांचाही प्रयत्न आहे. पण, या कसोटीला सुरुवात होण्यापूर्वी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन ( Kane Williamson) याला धक्का बसला आहे आणि त्याला बसलेल्या या धक्क्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याला संधी मिळाली आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विश्रांतीवर गेलेला विराट दुसऱ्या कसोटीतून पुनरागमन करत आहे.
आयसीसीनं बुधवारी जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत केनची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या स्थानावर सरकला आहे. रोहित शर्मा व विराट कोहली अनुक्रमे पाचव्या व सहाव्या स्थानावर कायम आहेत. इंग्लंडचा कर्णधार जो रूट 903 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. स्मिथ ( 891), केन ( 888), मार्नस लाबुशेन ( 878) व रोहित ( 805) हे टॉप फाईव्ह फलंदाज आहेत. विराट 775 रेटिंग गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे आणि त्याला दुसऱ्या कसोटीत दमदार कामगिरी करून क्रमवारी सुधारण्याची संधी आहे.