मुंबई - न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने ३७२ धावांनी विजय मिळवत मालिकेवर १-० ने कब्जा केला. भारताने दिलेल्या ५४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ अवघ्या १६७ धावांत गारद झाला. न्यूझीलंडवर मिळवलेला हा विजय हा विराट कोहलीचा कर्णधार म्हणून ५० वा कसोटी विजय ठरला. त्याबरोबरच कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये ५० हून अधिक विजय मिळवणारा विराट कोहली हा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. सचिन तेंडुलकर, एम.एस. धोनी आणि रिकी पाँटिंग अशा दिग्गज खेळाडूंनाही अशी कामगिरी करता आलेली नाही.
कसोटी क्रिकेटचा विचार केल्यास रिकी पाँटिंगने एक खेळाडू म्हणून सर्वाधिक १०८ विजय मिळवले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्याने सर्वाधिक २६२ विजय मिळवले आहेत. मात्र टी-२० मध्ये रिकी पाँटिंगला केवळ ७ विजय मिळवता आले आहेत. विराट कोहलीचा विचार केल्यास त्याने कसोटीमध्ये ५०, एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५३ आणि टी-२० मध्ये ५९ सामने जिंकले आहेत. त्यामुळे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये विराटने बोलबाला प्रस्थापित केला आहे.
भारताकडून सचिन तेंडुलकरने सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. सचिनने कसोटीमध्ये ७२ विजयांची नोंद केली आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये २३४ विजय मिळवले आहेत. मात्र टी-२० मध्ये सचिनला केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर महेंद्र सिंग धोनीने कसोटीत ३६, एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०५ आणि टी-२० मध्ये ५७ विजय मिळवले आहेत. म्हणजेच धोनीला कसोटीमध्ये ५० विजय मिळवता आले नव्हते. धोनी कर्णधारपदावरून बाजूला झाल्यानंतर विराटने भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळले होते.
दरम्यान, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा विचार केल्यास पाकिस्तानच्या शोएब मलिकच्या नावावर सर्वाधिक विजयांची नोंद आहे. मलिकने सर्वाधिक ८६ टी-२० सामने जिंकले आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने १५६ सामने जिंकले आहेत. तर कसोटीमध्ये १३ विजय मिळवले आहेत. रोहित शर्माचा विचार केल्यास त्याने टी-२० मध्ये ७८, एकदिवसीय क्रिकेटमध्ये १३८ आणि कसोटी क्रिकेटमध्ये केवळ २४ सामने जिंकले आहेत. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांचा विचार केल्यास विराट कोहली या सर्वांना वरचढ दिसून येत आहे.