India vs New Zealand, 2nd Test Weather Report : भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या मालिकेतील कानपूर कसोटीतील सामना अत्यंत चुरशीचा झाला. न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी 27 षटकं खेळून काढताना सामना अनिर्णीत राखला. आता दोन्ही संघ मुंबईत दाखल झाले आहेत आणि वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारपासून दुसरी कसोटी सुरू होणार आहे. पाच वर्षांनंतर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कसोटी सामना होणार आहे आणि 25 टक्के प्रेक्षकक्षमतेला महाराष्ट्र सरकारनं परवानगी दिली आहे. काल तिकिट विक्रिला सुरूवात झाली आणि अवघ्या 30 मिनिटांत सर्व तिकिटं विकली गेली. पण, चाहत्यांच्या या आनंदावर पाणी फिरण्याची शक्यता आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे आदी भागांत बुधवारी पाऊस पडत आहे आणि पुढील 2-3 दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
दक्षिण - पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्विपमधील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुन्हा एकदा हवामानात उल्लेखनीय बदल झाले आहेत. या हवामान बदलामुळे २ डिसेंबरपर्यंत राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेषत: १ डिसेंबर रोजी पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, मुंबई परिसरातदेखील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ''अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर जाणवेल. उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे,'' अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिली.
काय सांगतो हवामानाचा अंदाज?
2 डिसेंबरला पावसाची शक्यता आहे, तर 3 डिसेंबरला ढगाळ वातावरण असेल. त्यामुळे दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या खेळावर किंचितसा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. 4 व 5 डिसेंबरलाही किंचितसे ढगाळ वातावरण असेल, 6 डिसेंबरला लख्ख सूर्यप्रकाश असणार आहे. त्यामुळे तुर्तास तरी दुसरी कसोटी रद्द होणार नाही, असेच चित्र आहे.
वानखेडेवरील आकडेवारी
- आतापर्यंत येथे झालेल्या 25 सामन्यांपैकी 11 सामने भारतानं जिंकले आहेत, तर 7 मध्ये पराभव पत्करावा लागला आहे. 7 सामने अनिर्णीत राहिले आहेत.
- न्यूझीलंडनं येथे दोन कसोटी सामने खेळले आहेत. 1976मध्ये येथे खेळलेल्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंडवर टीम इंडियानं 162 धावांनी विजय मिळवला होता. 1988मधील कसोटीत न्यूझीलंडनं 136 धावांनी भारताला पराभूत केले होते.
संबंधित बातमी
विराट कोहली संघात परतणार, जाणून घ्या कर्णधारासाठी संघातील स्थान कोण सोडणार
Web Title: IND vs NZ, 2nd Test Weather Report: Mumbai all set to host test match after 5 years, but what is weather report on match day?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.