Join us  

IND vs NZ 3rd ODI : पावसामुळे भारताचा आणखी एक पराभव टळला; यजमानांनी १-० ने मालिकेवर केला कब्जा

IND vs NZ 3rd ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्या मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 2:50 PM

Open in App

India vs New Zealand 3rd ODI । नवी दिल्ली : सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेत ०-१ अशा पिछाडीवर असलेला भारतीय संघ आज मालिका वाचवण्यासाठी संघर्ष करताना पाहायला मिळाला. मात्र पावसाने केलेल्या बॅटिंगमुळे शिखर सेना चांगलीच धुवून निघाली आणि भारताला ०-१ ने मालिका गमवावी लागली. पावसामुळे मालिकेतील आजचा सामना रद्द करावा लागला त्यामुळे यजमान संघाने १-० ने मालिका जिंकली. भारताचा संपूर्ण संघ २१९ धावांत तंबूत परतला होता. श्रेयस अय्यरने सातत्य राखताना ४९ धावा केल्या, तर वॉशिंग्टन सुंदरनेही दमदार ५१ धावा चोपल्या. रिषभ मात्र १६ चेंडूंत १० धावांवर माघारी परतला.  शुबमन गिल ( १३) आणि शिखर धवन ( २८) यांनी  ३९ धावांची भागीदारी केली. त्यानंतर गिल केवळ १३ धावांवर माघारी परतला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि शिखर धवन यांनी डाव सावरण्यास सुरूवात केली. श्रेयसने वन डे क्रिकेटमधील फॉर्म कायम राखताना ५९ चेंडूंत ४९ धावांवर माघारी परतला. 

यजमान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरूवात निराशाजनक झाली होती. सूर्यकुमार यादव (६), दीपक हुडा ( १२), दीपक चहर (१२) हेही फार कमाल करू शकले नाही. वॉशिंग्टन सुंदरने टीम इंडियाची लाज वाचवली. त्याने ६४ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५१ धावांची खेळी करताना ५ बाद १२५ धावांवरू संघाला २१९ धावांपर्यंत पोहोचवले. डम मिल्ने व डॅरील मिचेल यांनी सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या सलामीवीरांनीच भारतीय गोलंदाजांचा घाम काढला. १७व्या षटकात उम्रान मलिकने भारताला पहिले यश मिळवून दिले. फिन लन ५४ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ५७ धावांवर बाद झाला. खरं तर भारतीय संघाला संपूर्ण ५० षटके देखील खेळता आली नाहीत आणि संघ ४७.३ षटकांत केवळ २१९ धावांवर सर्वबाद झाला. 

भारताने दिलेल्या २२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना किवी संघाने शानदार सुरूवात केली. न्यूझीलंडकडून सलामीवीर फिन लनने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली. तर डेव्होन कॉन्वे ५१ चेंडूत ३८ धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडच्या डावाचे १८वे षटक पूर्ण होताच पावसाचे आगमन झाले आणि खेळ थांबला. प्रतिस्पर्धी संघाची ९७ धावसंख्या असताना भारताकडून उम्रान मलिकने एक बळी पटकावला. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडशिखर धवनभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयपाऊस
Open in App