भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. शनिवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर आठ विकेट्स राखून मात केली. आता या मालिकेतील तिसरा सामना २४ जानेवारी रोजी इंदूर येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. कर्णधार रोहित शर्माने इंदूरमध्ये खेळवल्या जाणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघाच दोन बदल करण्याचे संकेत दिले आहेत.
भारतीय संघ पुढच्या महिन्यापासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्यादृष्टीने ही मालिका भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण आहे. या मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्माने कंबर कसली आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामधून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्याचे संकेत रोहित शर्मा यांनी दिले आहेत.
रायपूर येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर रोहित शर्माने सांगितले की, गेल्या पाच सामन्यांमध्ये गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. भारतामध्ये अशाप्रकारची वेगवान गोलंदाजी कुणी पाहिली नसेल. शमी आणि सिराजने सलग गोलंदाजी केली आहे. आता मी त्यांना सांगितलंय की पुढे एक कसोटी मालिकाही होणार आहे. त्यामुळे मी त्यांना स्वत:ची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही रोहित शर्माने शमी आणि सिराजकडून केवळ १२ षटकेच गोलंदाजी करून घेतली. त्यात शमीने ६ षटकांमध्ये १८ धावा देऊन ३ विकेट्स मिळवले. तर सिराजने ६ षटकांमध्ये १० धावा देत एक बळी टिपला. दरम्यान, रोहित शर्माने सांगितले की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दोन्ही गोलंदाज ताजेतवाने राहावेत, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळेच इंदूरमध्ये होणाऱ्या तिसऱ्या वनडेत उमसान मलिकला संधी दिली जाईल.