Join us  

IND vs NZ, 3rd ODI Live : एक नंबर! भारतीय संघाने तिसरी वन डे जिंकली, ICC Ranking मध्ये इंग्लंडला खेचले खाली

भारताने तिसरी वन डे जिंकून मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले,

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 9:00 PM

Open in App

India vs New Zealand, 3rd ODI Live : रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि शुभमन गिल ( Shubman Gill ) यांच्या शतकी खेळीनंतर हार्दिक पांड्याने फटकेबाजी केली अन् भारताला ३८५ धावांपर्यंत मजल मारून दिली. या लक्ष्याचा पाटलाग करताना न्यूझीलंडचे फलंदाज ढेपाळतील असे वाटले होते, परंतु डेव्हॉन कॉनवे जबरदस्त खेळला. त्याने सहकाऱ्यांना सोबत घेऊन भारताला दडपणात ठेवले. मात्र, त्याची विकेट पडली अन् किवींची गाडी घसरली. भारताने तिसरी वन डे जिंकून मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले, शिवाय वन डे क्रमवारीत अव्वल स्थानही पटकावले.  

फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर न्यूझीलंडकडूनही जबरदस्त खेळ होईल अशी अपेक्षा होती, परंतु हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकात फिन अ‌ॅलनला माघारी पाठवले. डेव्हॉन कॉनवे व हेन्री निकोल्स यांनी १०६ धावांची भागीदारी करून न्यूझीलंडचा डाव रुळावर आणला. पण, कुलदीप यादपने निकोल्सला ( ४२) पायचीत करून ही जोडी तोडली. कॉनने एकाकी झुंज देत राहिला आणि त्याने ७१ चेंडूत शतक पूर्ण केले. कॉनवे व  डॅरील मिचेल यांची ७८ धावांची सेट झालेली जोडी शार्दूल ठाकूरने अनपेक्षित बाऊन्सर टाकून तोडली. मिचेलला २४ धावांवर माघारी जावे लागले. शार्दूलने पुढच्याच चेंडूवर किवी कर्णधार टॉम लॅथमला ( ०) माघारी पाठवून मॅच फिरवली.  पुढच्याच षटकात शार्दूलने चतुराईने गोलंदाजी करताना ग्लेन फिलिप्सला ( ५) विराट कोहलीच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. न्यूझीलंडचा निम्मा संघ २०० धावांवर परतला माघारी. शार्दूलची ही वन डे तील पन्नासावी विकेट ठरली. कॉनवे मैदानावर असल्याने भारतीय चाहत्यांच्या मनात धाकधूक सुरू होतीच. किवींना अखेरच्या २० षटकांत ९ च्या सरासरीने धावा करायच्या होत्या आणि आताच्या क्रिकेटमध्ये हे अशक्य अजिबात नव्हते. पण, उम्रान मलिकने किवींसाठी ते अशक्य बनवले. उम्रानच्या वेगवान चेंडूचा कॉनवेला अंदाज नाही घेता आला अन् रोहितच्या हाती त्याने झेल दिला. कॉनवे १०० चेंडूंत १२ चौकार व ८ षटकारांसह १३८ धावांवर माघारी परतला. मायकेल ब्रेसवेल व मिचेल सँटनर ही जोडी खेळपट्टीवर होती अन् भारतीय चाहत्यांनी पहिल्या वन डेतील त्यांच्या खेळीची धास्ती घेतली होती. पण, कुलदीप यादवने चतुराईने ही जोडी तोडली. ब्रेसवेलला २६ धावांवर इशान किशनने यष्टिचीत केले. कुलदीपने आणखी एक धक्का देताना ल्योकी फर्ग्युसनला ( ७) बाद केले. रोहितने एक हाताने मस्त झेल घेतला. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ २९५ धावांवर माघारी परतला आणि भारताने ९० धावांनी सामना जिंकला. शार्दूल व कुलदीप यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. भारताने ११४ रेटींग गुणांसह आयसीसी वन डे क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. इंग्लंडला ( ११३) मागे टाकले. 

रोहित, शुभमनची शतकी खेळी, हार्दिक पांड्यानेही केली धुलाई... रोहित ८५ चेंडूंत ९ चौकार व ६ षटकार खेचून १०१ धावांवर त्रिफळाचीत  झाला. त्यानंतर शुभमन ७८ चेंडूंत १३ चौकार व ५ षटकारांसह ११२ धावांवर ब्लेअर टिकनरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. इशान व विराट यांनी ३८ धावांची भागीदारी केली. इशान १७ धावांवर रन आऊट झाला, पाठोपाठ विराट ३६ धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादव ( १४) व वॉशिंग्टन सुंदर ( ९) हेही माघारी परतले. ० बाद २१२ वरून भारताची अवस्था ६ बाद ३१३ अशी झाली. हार्दिक पांड्या व शार्दूल ठाकूर यांनी ३४ चेंडूंत ५४ धावांची भागीदारी केली. शार्दूल १७ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह २५ धावांवर माघारी परतला. हार्दिक ३८ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावांवर बाद झाला. किवी गोलंदाज जेकब डफीने १० षटकांत १०० धावा देत ३ विकेट्स घेतल्या. भारताने ९ बाद ३८५ धावा केल्या. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडरोहित शर्माशुभमन गिलआयसीसी
Open in App