इंदौर : आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे मालिकेतील अखेरचा सामना खेळवला जात आहे. खरं तर मालिकेतील पहिले 2 सामने जिंकून यजमान भारतीय संघाने मालिकेवर कब्जा केला आहे. त्यामुळे आजचा सामना टीम इंडियासाठी केवळ औपचारिकताच असणार आहे. पाहुण्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करायला आलेल्या रोहित शर्मा आणि शुबमन गिलच्या जोडीने किवी संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. भारतीय सलामीवीरांनी पहिल्या 10 षटकांत 82 धावा कुटल्या. गिल आणि रोहितच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताने शानदार सुरूवात केली.
14 षटकांपर्यंत भारतीय संघाची धावसंख्या 114 एवढी झाली आहे. सध्या रोहित शर्मा (58) आणि शुबमन गिल (54) नाबाद खेळत आहेत. लक्षणीय बाब म्हणजे पहिल्या 10 षटकातील 70 धावा या केवळ चौकार आणि षटकारातून आल्या आहेत.
दरम्यान, आजच्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात अनेक बदल केले जातील अशी अपेक्षा होती. पण प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसा बदल झाला नाही. कारण अगोदरच मालिका खिशात घातल्यामुळे वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊन बाकावर असलेल्यांना संधी मिळेल अशी चर्चा होती. मात्र, संघात 2 बदल केले असून उमरान मलिक आणि युझवेंद्र चहल यांना मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्या जागी संघात स्थान मिळाले आहे. आजचा सामना इंदौरमधील होळकर स्टेडियमवर पार पडत आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, उमरान मलिक.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"