India vs New Zealand, 3rd ODI Live : रोहित शर्माने १६ महिन्यांचा आंतरराष्ट्रीय शतकांचा दुष्काळ आज संपवला. त्याने आणि शुभमन गिल या दोघांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी बेक्कार धुलाई केली. शुभमन गिल फॉर्मात होताच, परंतु सर्वांचे लक्ष रोहितच्या शतकाकडे लागले होते. रोहितने ३ वर्षांनंतर वन डेत शतक झळकावले आणि त्यापाठोपाठ गिलनेही शतक पूर्ण केले. शुभमन गिलने आजच्या खेळीने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याच्या विक्रमाशी बरोबरी केली.
३ वर्षांनंतर रो'हिट' शर्माने वन डेत शतक झळकावले, शुभमन गिलसह वादळी खेळी करत अनेक विक्रम मोडले
रोहित शर्माचा हा ४३५ वा आंतरराष्ट्रीय सामना आहे आणि त्याने मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकले. सचिन तेंडुलकरने भारताकडून सर्वाधिक ६६४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी ( ५३५), राहुल द्रविड ( ५०४) व विराट कोहली ( ४९०) यांचा क्रमांक येतो. आजच्या सामन्यात रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी आक्रमक सुरुवात केली. या दोघांनी ७८ चेंडूंत शतकी आकडा फलकावर चढवला. रोहितने वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांत तिसरे स्थान पटकावले. शाहिद आफ्रिदी ३५१ आणि ख्रिस गेल ३३१ षटकारांसह अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने आज २७३* वा षटकार खेचला अन् सनथ जयसूर्याचा ( २७०) विक्रम मोडला.
शुभमन गिलनेही तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजाचा विक्रम नावावर केला. त्याने या मालिकेत ३१४+ धावा करताना विराट कोहलीचा ( २८३ धावा वि. श्रीलंका, २०२३) विक्रम मोडला. रोहित शर्मा व शुभमन गिल यांची २०६ धावांची भागीदाही ही न्यूझीलंडविरुद्ध भारतीयांनी केलेली सर्वोत्तम भागीदारी ठरली. रोहित शर्मा ८५ चेंडूंत ९ चौकार व ६ षटकार खेचून १०१ धावांवर बाद झाला. शुभमन गिल ७८ चेंडूंत १३ चौकार व ५ षटकारांसह ११२ धावांवर माघारी परतला.
तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत सर्वाधिक ३६० धावा करण्याच्या बाबर आजमच्या विक्रमाशी शुभमनने आज बरोबरी केली. बाबरने २०१६मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध १२०च्या सरासरीने ३६० धावा केल्या होत्या. शुभमनने न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेत १८०च्या सरासरीने ३६० धावा करून बाबरशी बरोबरी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"