Rohit Sharma Team India, IND vs NZ 3rd ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना आज (२४ जानेवारी) इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा १२ धावांनी पराभव केला होता. त्याचवेळी दुसऱ्या सामन्यात आठ गडी राखून नेत्रदीपक विजय मिळवला होता. अशा परिस्थितीत 'मेन इन ब्लू' भारतीय संघाने हा सामना जिंकल्यास मालिका ३-० अशी खिशात घातली जाईल. तिसरी वन डे जिंकून भारताला नंबर 1 होण्याची संधीही आहे.
कोहली-रोहितला शुबमनची मिळाली साथ
सलामीवीर शुबमन गिल चांगल्या फॉर्ममध्ये आहे. गिलने पहिल्या सामन्यात द्विशतक तर दुसऱ्या सामन्यात नाबाद ४० धावांची खेळी केली होती. कर्णधार रोहित शर्मानेही दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले आणि आता तिसऱ्या सामन्यात त्याला मोठी धावसंख्या उभारायची आहे. श्रीलंकेविरुद्ध दोन आणि बांगलादेशविरुद्ध एक शतक झळकावणारा विराट कोहली पहिल्या दोन सामन्यांत अपयशी ठरला होता, त्यामुळे त्याचे लक्ष्यही मोठा डाव खेळण्याचे असू शकते. पण असे असले तरीही त्याला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.
कोहलीच्या जागी रजत पाटीदारला मिळणार संधी?
टी२० नंबर 1 फलंदाज सूर्यकुमार यादवकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती पण मालिकेतील पहिल्या सामन्यात तो अपयशी ठरला. हार्दिक पांड्याही मधल्या फळीत पुरेसे योगदान देऊ शकलेला नाही. पदार्पणाच्या प्रतिक्षेत असलेला रजत पाटीदारही संघात आहे. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापन रजतला पदार्पण देते की नाही हे पाहावे लागेल. पाटीदारने देशांतर्गत स्तरावर आपल्या कामगिरीने छाप पाडली आहे. तसे, गोलंदाजी विभागात बदल होण्याची अधिक शक्यता आहे.
उमरान मलिक खेळण्याची शक्यता
मोहम्मद शमी किंवा मोहम्मद सिराजच्या जागी वेगवान गोलंदाज उमरान मलिकला संधी मिळण्याची शक्यता आहे. फिरकी गोलंदाजी आक्रमणाचा प्रश्न असेल तर लेगस्पिनर युजवेंद्र चहलच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. अशा वेळी कुलदीप यादवला वगळले जाण्याची शक्यता नाही. कारण त्याने अलीकडच्या काळात भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. वॉशिंग्टन सुंदरलाही संघात कायम राहण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, हा सामना जिंकून भारताला क्लीन स्वीप करण्यापासून रोखण्याचा न्यूझीलंड सर्वतोपरी प्रयत्न असेल. न्यूझीलंडला फलंदाजीत कर्णधार केन विल्यमसनची उणीव भासत आहे. न्यूझीलंडच्या टॉप ६ फलंदाजांनी गेल्या ३० डावांमध्ये केवळ सात वेळा ४० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. सध्याच्या मालिकेत आतापर्यंत फक्त मायकेल ब्रेसवेल आपल्या फलंदाजीच्या कामगिरीत प्रभाव पाडू शकला आहे. मिचेल सँटनरनेही हैदराबादमधील पहिल्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती. पण एकूण पाहता भारताचे पारडे जड मानले जात आहे.