IND vs NZ, 3rd ODI: 'संघातील लोक त्याला जादूगर म्हणतात...'; रोहित शर्माने सामन्यानंतर 'या' खेळाडूचे केलं कौतुक

IND vs NZ, 3rd ODI: भारताने न्यूझीलंडचा सलग तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभव करत तीन सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 09:53 AM2023-01-25T09:53:18+5:302023-01-25T09:53:39+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ, 3rd ODI: Team members call Shardul Thakur a magician, says India captain Rohit Sharma | IND vs NZ, 3rd ODI: 'संघातील लोक त्याला जादूगर म्हणतात...'; रोहित शर्माने सामन्यानंतर 'या' खेळाडूचे केलं कौतुक

IND vs NZ, 3rd ODI: 'संघातील लोक त्याला जादूगर म्हणतात...'; रोहित शर्माने सामन्यानंतर 'या' खेळाडूचे केलं कौतुक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताने न्यूझीलंडचा सलग तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभव करत तीन सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामीवीरांच्या शतकाच्या जोरावर भारताने ५० षटकांत ९ बाद ३८५ धावा उभारल्या. यानंतर, न्यूझीलंडला ४१.२ षटकांत २९५ धावांमध्ये गुंडाळत भारताने ९० धावांनी बाजी मारली. यासह भारतीय संघाने आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानही पटकावले.

भल्यामोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना, न्यूझीलंडकडून सलामीवीर डीवोन कॉन्वेने १०० चेंडूंत १३८ धावा काढताना १२ चौकार व ८ षटकार ठोकले. मात्र, त्याला इतर फलंदाजांकडून अपेक्षित साथ लाभली नाही. हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकात फिन अॅलेनला त्रिफळाचीत केले. यानंतर, किवींना ठरावीक अंतराने धक्के बसले. कॉन्वेने एक बाजू लावून धरत एकाकी झुंज दिली. शार्दुल ठाकूरने ३ बळी घेत, न्यूझीलंडला हादरे दिले. त्याने २६व्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर अनुक्रमे डेरील मिचेल आणि कर्णधार टॉम लॅथम यांना बाद करून भारताला मजबूत पकड मिळवून दिली. चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवनेही ३ बळी घेतले.

शार्दुलने आपल्या २६व्या षटकात न्यूझीलंडच्या दोन विकेट्स घेत सामना भारताचे पारडे जड केले. सामना जिंकल्यानंतर रोहितने देखील शार्दुल ठाकुरचे कौतुक केले. तिसऱ्या सामन्यानंतर प्रेझेंटेशनमध्ये जेव्हा रोहित शर्मालाशार्दुल ठाकूरबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने हसत उत्तर दिले. रोहितने सांगितले की, शार्दुल ठाकूर दीर्घ काळापासून संघासाठी हे करत आहे. संघातील लोक त्याला जादूगार म्हणतात. अनेकवेळा तो येतो आणि योग्यवेळी विकेट्स घेतो. फक्त त्याला अधिकाधिक संधी देण्याची गरज आहे, असं रोहित म्हणाला. रोहित शर्माने इतर खेळाडूंचे देखील कौतुक केले. शतकवीर शुभमन गिलबद्दल रोहित शर्मा म्हणाला की, तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि तरुण खेळाडूने ज्या पद्धतीने विचार केला पाहिजे त्याच पद्धतीने तो पुढे जात आहे, असं म्हणत रोहितने शुभमनचे कौतुक केले.

दरम्यान,  होळकर स्टेडियम कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामीवीरांच्या चौफेर फटकेबाजीने गाजला. दोघांनी झळकावलेल्या शतकाच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर धावांचा हिमालय उभारला. रोहितने सुमारे एक हजार दिवसांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक झळकावताना किवी गोलंदाजी फोडून काढली. त्याला शानदार साथ दिलेल्या गिलने पुन्हा एकदा मोठी खेळी केली. रोहितने ८५ चेंडूंत २ चौकार व ६ षटकारांसह १०१ धावा चौपल्या. गिलने ७८ चेंडूंत १३ चौकार व ५ षटकारांसह ११२ धावा कुटल्या. दोघांनी २१२ धावांची जबरदस्त सलामी दिली. 

मालिकेत शानदार फॉर्ममध्ये असलेल्या मायकेल ब्रेसवेलने अखेर ही जोडी फोडताना न्यूझीलंडला पहिले यश मिळवून दिले. त्याने २७व्या षटकात रोहितला त्रिफळाचीत केले. यानंतर, भारताला ठरावीक अंतराने धक्के बसले. मात्र, अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या (३८ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावा) फटकेबाजीमुळे भारताने सहजपणे ३५० धावांचा पल्ला पार केला. स्टार फलंदाज विराट कोहली (२७ चेंडूंत ३६ धावा) चांगल्या स्थितीत असताना बाद झाला. इशान किशन (१७), सूर्यकुमार यादव (१४) यांना अपेक्षित फटकेबाजी करता आली नाही. शार्दुल ठाकूरने १७ चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह २५ धावांची छोटेखानी फटकेबाजी केली. जेकब डफीने १०० धावांची खैरात करताना ३ बळी घेतले. ब्लेर टिकनेरही ७६ धावांत ३ बळी घेतले.

Web Title: IND vs NZ, 3rd ODI: Team members call Shardul Thakur a magician, says India captain Rohit Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.