कोलकाता - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी-२० सामना हा आज कोलकाता येथील ईडन गार्डनवर खेळवला जाणार आहे. या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकत भारतीय संघाने टी-२० मालिका आधीच खिशात घातली आहे. त्यामुळे आजच्या सामन्याच्या निकालाचा मालिकेच्या निकालावर काहीही परिणाम होणार नाही. मात्र आजच्या सामन्यात विजय मिळवल्यास भारतीय संघाच्या नावे एक खास रेकॉर्ड होणार आहे.
न्यूझीलंडविरुद्ध कोलकातामधल तिसरा टी-२० सामना जिंकल्यास टीम इंडिया मालिकेत ३-० ने क्लीन स्विप करेल. अशा स्थितीत टीम इंडियाची न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेत क्लीन स्विप करण्याची ही सलग दुसरी वेळ ठरेल. याआधी २०२०मध्ये झालेल्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने न्यूझीलंडला त्यांच्याच मैदानात पराभवाची धूळ चारली होती. त्यावेळी भारतीय संघाने पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत ५-० ने बाजी मारली होती.भारत आणि न्यूझीलंडमधील ही टी-२० मालिका २०२० मध्ये खेळली गेली होती. त्यावेळी भारतीय संघाने ५-० अशी क्लीन स्विप केली होती. त्या मालिकेतील पहिल्या चार सामन्यांत विराट कोहलीने भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. तर शेवटच्या सामन्यात रोहित शर्माने संघाचं नेतृत्व केलं होतं.
सध्या खेळवण्यात येत असलेली टी-२० मालिका ही भारत आणि न्यूझीलंडच्या संघामधील सहावी टी-२० मालिका आहे. यातील तीन मालिकांमध्ये भारताने तर तीन मालिकांमध्ये न्यूझीलंडने बाजी मारली आहे. भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिली टी-२० मालिका २००९ मध्ये खेळवली गेली होती. भारत आणि न्यूझीलंडच्या संघांमध्ये आतापर्यंत १९ टी-२० सामने खेळवण्यात आले आहेत. त्यामधील ८ सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तर ९ सामन्यांमध्ये न्यूझीलंडने बाजी मारली आहे. तर टास झालेल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाने सुपरओव्हरमध्ये बाजी मारली आहे.