IND vs NZ, 3rd T20I : भारतीय संघाने तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका २-१ अशी जिंकली. अहमदाबाद येथे झालेल्या निर्णायक सामन्यात भारताने ट्वेंटी-२० क्रिकेट इतिहासातील त्यांचा सर्वात मोठा विजय मिळवला. २३४ धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडला भारतीय गोलंदाजांनी ६६ धावांत गुंडाळले आणि १६८ धावांनी बाजी मारली. शुभमन गिलने या सामन्यात शतकी खेळी करून अनेक विक्रम मोडले. या सामन्यानंतर हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) मोठं विधान केलं.
नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने ४ बाद २३४ धावा केल्या. शुभमन गिलने १२ चौकार व ७ षटकारांसह १२६ धावांवर नाबाद राहिला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात युवा वयात शतक झळकाण्याचा विक्रमही शुभमनने नावावर केला. राहुल त्रिपाठीने २२ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४४ धावा, सूर्यकुमार यादवने २४ धावा आणि हार्दिकने १७ चेंडूंत ३० धावा करून योगदान दिले. हार्दिकने गोलंदाजीतही कमाल केली. त्याने १६ धावा देताना चार विकेट्स घेतल्या. उम्रान मलिका ( २-९), शिवम मावी ( २-१२) आणि अर्शदीप सिंग ( २-१६) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
हार्दिक पांड्या सामन्यानंतर म्हणाला, "खरं सांगायचं तर मलाही षटकार मारायला आवडतात. पण आता मला स्वत:ला आणखी पुढे न्यावं लागणार आहे. यासाठी मला माझा स्ट्राईक रेट कमी करावा लागला तरी चालेल. कारण जेव्हा मी युवा होतो, महेंद्रसिंग धोनी त्यावेळी मैदानात असायचा आणि मी मोकळेपणाने मोठमोठे फटके मारायचो. पण, आता त्याच्या निवृत्तीनंतर तिच जबाबदारी माझ्यावर आली आहे, असं मला वाटतंय. तरुणांना संधी देताना मी सिनियर म्हणून जबाबदारी घेतोय. मला अनुभव आहे आणि मला येथे फलंदाजी कशी करायची हे माहित आहे.''
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"